नीरज चोप्राने सुवर्ण मिळविल्यास मोफत व्हिसा
स्टार्टअप ‘अॅटलिस’चे संस्थापक मोहक नाहटा यांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एका धाडसी आणि अभूतपूर्व घोषणेत व्हिसा स्टार्टअपच्या एका भारतीय वंशाच्या सीईओने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यास सर्वांना मोफत व्हिसा देण्याचे वचन दिले आहे. ‘अॅटलिस’चे संस्थापक मोहक नाहटा यांनी ‘लिंक्डइन’वर हे वचन जाहीर केल्यानंतर ते त्वरित व्हायरल झाल्याशिवाय राहिले नाही. या घोषणेमुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
चोप्राने पदकांच्या मानकऱ्यांमध्ये अव्वल स्थान मिळविल्यास अॅटलिस आपली सेवा घेणाऱ्या सर्वांना संपूर्ण दिवसासाठी मोफत व्हिसा प्रदान करेल. याचा अर्थ कोणीही राष्ट्रीयत्वाची पर्वा न करता, कोणताही खर्च न करता कोणत्याही देशातील व्हिसासाठी अर्ज करू शकतो. ‘नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यास मी व्यक्तिश: प्रत्येकाला विनामूल्य व्हिसा पाठवेन. चला जाऊया’, असे नाहटा यांनी ‘लिंक्डइन’वर पोस्ट केले आहे.
नाहटा यांनी स्पष्ट केले आहे की, सर्व देशांसाठी मोफत व्हिसा दिला जाईल आणि अर्जदाराला कोणताही खर्च करावा लागणार नाही. ‘30 जुलै रोजी नीरज चोप्राने सुवर्ण जिंकल्यास मी सर्वांना मोफत व्हिसा देण्याचे वचन दिले होते. बऱ्याच जणांनी तपशील विचारला असल्याने ही प्रक्रिया कशी होईल ते मी येथे देत आहे. नीरज चोप्रा 8 ऑगस्ट रोजी पदकासाठी स्पर्धेत उतरेल. जर त्याने सुवर्ण जिंकले तर आम्ही एका संपूर्ण दिवसासाठी आमची सेवा वापरणाऱ्या सर्वांना एक विनामूल्य व्हिसा देऊ’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘आम्ही बदल्यात काही शुल्क घेऊ का ? तर या व्हिसासाठी शून्य खर्च येईल. तो भार पूर्णपणे आमच्यावर राहील. या ऑफरच्या अंतर्गत कोणते देश समाविष्ट आहेत ? तर सर्व देश हे त्याचे उत्तर आहे. तम्हाला कुठला दौरा करायचा आहे ते तुम्ही निवडा. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ? खाली कॉमेंट्समध्ये तुमचा ईमेल टाका आणि आम्ही तुमच्यासाठी मोफत व्हिसा क्रेडिटसह खाते तयार करू’, असे नाहटा यांनी लिंक्डइनवरील दुसऱ्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
या पोस्टना हजारो लाईक्स मिळाले असून एकाने लिहिले आहे, ‘कम ऑन नीरज, मला युरोपला जायला आवडेल’. ‘अॅटलिस’ हे स्टार्टअप जलद प्रवासी व्हिसा आणि भेट दिल्या जाणार असलेल्या स्थळाविषयी नवीनतम माहिती प्रदान करते.