For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे प्रवास एक वर्षभर फुकट

06:03 AM Mar 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
रेल्वे प्रवास एक वर्षभर फुकट
Advertisement

रेल्वे हे प्रवासाचे एक सोयीस्कर आणि किफायतशीर साधन आहे. त्यामुळे जगभरात अनेक लोक रेल्वेतून प्रवास करण्याला प्राधान्य देतात. अर्थातच, हे साधन त्या मानाचे कमी खर्चाचे असले, तरी त्याचे तिकिट हे काढावेच लागते. पण, काही लोक असे असतात की ते रेल्वेतून विनामूल्य प्रवास करण्यासाठी अनेक युक्त्या शोधून काढतात. त्यामुळे जगभरातील रेल्वे व्यवस्थापनेही सतर्क असतात आणि अशा फुकट्या प्रवाशांना पकडून जबर दंड केला जातो. तरीही फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अनेक देशांचे म्हणणे आहे.

Advertisement

ब्रिटनचा निवासी असणारा एड वेज नामक व्यक्तीने एक अशी युक्ती शोधली, की ज्यामुळे त्याला एक वर्षभर रेल्वेचा फुकट प्रवास करता आला.  तरीही रेल्वे त्याच्या विरोधात काहीही कारवाई करु शकली नाही. या वर्षभरात त्याने ब्रिटनच्या रेल्वेला 1 लाख 6 हजार रुपयांहून अधिकचा चुना लावण्यात यश मिळविले होते. त्याने फुकटचा प्रवास केला, याचा अर्थ असा नव्हे, की त्याने तिकिट काढलेच नव्हते. पण तो तिकिटे अशा प्रकारे बुक करीत असे, की जेणेकरुन प्रवास केल्यानंतरही त्याला रेल्वेकडून तिकिटाचे जवळपास सर्व पैसे परत मिळत.

त्याने शोधलेली युक्तीही अद्भूत होती. त्याने विविध रेल्वेगाड्यांच्या वेळा आणि त्यांना होणारा उशीर यांचा बारकाईने अभ्यास केला. कोणत्या गाड्यांना केव्हा विलंब झाल्यानंतर प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळतात हे त्याच्या या अभ्यासावरुन नेमके लक्षात आले. मग त्याने तशा प्रकारे प्रवासाची योजना केली. प्रत्येकवेळी तो तिकिट बुक करत असे. विलंबाने आलेल्या गाडीतून प्रवास करीत असे आणि नंतर गाडीला विलंब झाला म्हणून रिफंडची मागणी करीत असे. त्याचा अभ्यास इतका अचूक होता की, बहुतेकवेळा त्याला रिफंड मिळत असे. ब्रिटनमध्ये नियम असा आहे, की रेल्वे 15 मिनिटे उशीरा आल्यास 25 टक्के, 30 मिनिटे विलंब झाल्यास 50 टक्के, आणि एक तास किंवा त्याच्यापेक्षा अधिक विलंब झाल्यास 100 टक्के पैसे परत मिळतात. या नियमाचा वेज याने पूर्ण लाभ उठविला. त्याच्या अभ्यासानुसार हरताळ, रेल्वेचा मेन्टेनन्स आणि प्रतिकूल हवामान या कारणांस्तव रेल्वे एका तासाहून अधिक उशीरा धावतात. तो अशाच स्थितीत सापडणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकीटे बुक करीत असे. जास्तीत जास्त विलंबाने धावणाऱ्या गाड्या त्याने हेरुन ठेवल्या होत्या. हा रहस्यभेद त्याने स्वत:च केला आहे. त्याच्या या युक्तीमुळेच त्याचे जवळपास 1 लाख 6 हजार रुपयांचा प्रवास खर्च वाचला होता.   तसेच, रेल्वेलाही त्याच्या विरोधात काही कारवाई करता येणे शक्य नव्हते, कारण त्याने रेल्वेनेच केलेल्या नियमांचा अभ्यास करुन त्यांचा लाभ उठविला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.