For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडाशी पुन्हा मुक्त व्यापार चर्चा होणार

06:35 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
कॅनडाशी पुन्हा मुक्त व्यापार चर्चा होणार
Advertisement

केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केली घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारत आणि कॅनडा हे देश पुन्हा एकमेकांशी मुक्त व्यापार करार करण्यासंबंधीची चर्चा करण्यास प्रारंभ करणार आहेत, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. मध्यंतरीच्या काळात भारत आणि कॅनडा यांच्यात शीख दहशतवादाच्या मुद्द्यावरुन मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे या चर्चेला खीळ बसली होती. पण आता दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे मुक्त व्यापार चर्चेचा पुन्हा प्रारंभ केला जाणार आहे. मुक्त व्यापार करार दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन पियुष गोयल यांनी सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना केले आहे.

Advertisement

चर्चेचा पुन्हा प्रारंभ झाल्यानंतर लवकरच दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता आहे. हा करार समतोल आणि उभयपक्षी हिताचा असा असेल. अशा करारामुळे दोन्ही देशांमधील गुंतवणूकदार, उद्योजक आणि व्यापारी यांच्या विश्वासात भर पडणार आहे. हा करार, सर्वंकश भागीदार करार म्हणून ओळखला जाईल, अशी माहितीही व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली आहे.

व्यापार दुप्पट करणार

भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापार येत्या 5 वर्षांमध्ये, अर्थात, 2030 पर्यंत आत्ताच्या दुप्पट करण्याचे ध्येय आहे. 2030 मध्ये हा व्यापार 50 अब्ज डॉलर्सचा होऊ शकेल, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला. भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांकडे मोठी आर्थिक क्षमता असून ती या भागीदारी करारामुळे द्विगुणित होईल. त्यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापारी तसेच उद्योजक यांनाही अधिकाधिक प्रोत्साहन मिळणार आहे, असे वक्तव्य गोयल यांनी केले.

2023 मध्ये खीळ

2023 मध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील मुक्त व्यापार चर्चेला कॅनडाच्या भूमिकेमुळे खीळ बसली होती. कॅनडाकडून चर्चा थांबविण्यात आली होती. कॅनडात हरदीपसिंग पुरी नामक एका खलिस्तानी समर्थकाची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येत भारत सरकारचा हात आहे, असा आरोप त्यावेळचे कॅनडाचे नेते जस्टीन ट्रूडो यांनी केला होता. भारताने त्या आरोपाचा तत्काळ स्पष्ट इन्कार केला होता. ट्रूडो यांनी त्यांच्या आरोपाचा कोणताही पुरावा सादर केला नाही. उलट, आपल्याकडे ठोस पुरावा नाही, पण अशी शंका आहे, असे विधान करुन स्वत:संबंधीच अविश्वास निर्माण केला होता. त्यानंतर एक वर्षात त्यांना कॅनडाचे नेतेपद सोडावे लागले होते. नंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष विजयी झाला. नंतर मार्क कर्नी यांच्याकडे कॅनडाची सूत्रे आली आहेत. कर्नी यांनी भारताशी पुन्हा पूर्वीसारखे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याला महत्व दिले आहे. परिणामी, थंडावलेली मुक्त व्यापार चर्चा आता लवकरच पुन्हा केली जाणार आहे.

निर्यातीत वृद्धी

2024 ते 2025 या आर्थिक वर्षात भारताकडून कॅनडाला होणाऱ्या निर्यातीत 9.8 टक्के वाढ झाली आहे. त्यावर्षी ही निर्यात 4.22 अब्ज डॉलर्सची झाली होती. तथापि, नंतर या निर्यातीत काहीही घट झाली होती. आता दोन्ही देशांमध्ये पुन्हा संबंध सुरळीत होण्याची शक्यता वाढल्याने व्यापार वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.