विद्यार्थ्यांना करून दिली मोफत टेम्पो सेवा
मच्छे येथील शिवतेज युवा संघटनेचा स्तुत्य उपक्रम : गावाजवळ बस थांबवत नसल्यामुळे घेतला पुढाकार
वार्ताहर/किणये
देसूर, नंदिहळळी, झाडशहापूर व खानापूर परिसरातून मच्छे गावाहून जाणाऱ्या बसेस बसथांब्याजवळ थांबवत नाहीत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता येत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याचा विचार करून मच्छे गावातील शिवतेज युवा संघटनेच्या माध्यमातून मच्छे येथून मजगाव क्रॉसपर्यंत या सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत टेम्पोतून त्यांना पाठवून देण्याची सोय करण्यात आली आहे. ही सोय दि. 15 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे.
मच्छे गावावरून जाणाऱ्या बसेस बस स्टॉपवर थांबवत नाहीत. याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्यांना तासन्तास बसथांब्यावर बसून राहावे लागत आहे. नंदिहळ्ळी, देसूर व खानापूर या भागातून येणाऱ्या बस या ठिकाणी का थांबविण्यात येत नाहीत, असा सवाल गावातील नागरिक व विद्यार्थी वर्ग करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य परिवहन मंडळाला शिवतेज युवा संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र तरीही राज्य परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बसथांब्यावर बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत लवकर जाणे, वेळेवर जाणे मुश्किल झाले आहे. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व बस थांबवत नसल्यामुळे शिवतेज युवा संघटनेचे कार्यकर्ते संतोष जैनोजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत मच्छे गावापासून मजगाव क्रॉसपर्यंत सोडण्याची टेम्पोतून व्यवस्था केली आहे. यामुळे या शिवतेज युवा संघटनेने एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दाखवलेली तत्परता उल्लेखनीय आहे. यापुढे जर बसेस थांबवत नसतील तर मच्छे रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवतेज युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.