विविध नेत्र विकारांवर वेंगुर्ल्यात मोफत शस्त्रक्रिया
नेत्रतज्ज्ञ गिरीष गद्रे यांची माहिती : आतापर्यंत ५५ रुग्णांनी घेतला लाभ : तिरळेपणावरही होणार मोफत उपचार
वार्ताहर
वेंगुर्ले
वेंगुर्ले शहर दाभोली नाका येथील डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयात आता डोळ्यांबाबतच्या विविध महागड्या विकारांवर मोफत शस्त्रक्रिया उपचार होणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया वगळता सर्वच महागड्या नेत्रविकारांवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात येतील, यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून याद्वारे जिल्ह्यातील गद्रे रुग्णालयाच्या सर्वच सेंटरवर आवश्यक ते सर्व कागदोपत्री सोपास्कार पूर्ण करण्यासाठी रुग्णांना सहाय्य केले जात आहे. जिल्हयातील रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गद्रे नेत्र रुग्णालयाचे संचालक डॉ. गिरीश गद्रे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या नेत्रविकाराचे रुग्ण वाढले आहेत. मधुमेहासारख्या आजारामुळे थेट नजरेवर परिणाम होत असून लोकांची लाईफस्टाईल बदलल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. डोळा हे मानवाचे सर्वांत संवेदनक्षम इंद्रीय आहे. मात्र, नेत्रविकारांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नेत्रविकाराचे रुग्ण वाढत आहेत. डोळ्यांच्या आजाराच्या शस्त्रक्रिया महागड्या असल्याने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून नेत्रविकारांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी आपण मत्स्य व बंदर विकास मंत्री मंत्री नीतेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. ही मागणी राणे यांनी तात्काळ मंजूर केली आहे. या योजनेचा त्यांच्याच हस्ते झाला असून त्यानंतर आतापर्यंत सुमारे ५५ नेत्ररुग्णांवर या योजनेतून मोफत उपचार केले आहेत, असे डॉ. गद्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी वेंगुर्ले येथील गद्रे रुग्णालयाचे उदय दाभोलकर व राजेंद्र म्हेत्रे उपस्थित होते.
मधुमेहावरील नेत्रपटल निदान व लेझर उपचार, रेटिनल डिटेचमेंट शस्त्रक्रिया, नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शनची सोय, लासरू (अश्रूपिशवी) वरील शस्त्रक्रिया, अपघातात डोळ्यांना इजा झाल्यास त्यावरील उपचार, तिरळेपणावरील शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार, १८ वर्षाखालील मुलांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी उपचार मोफत करण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या सर्व सुविधा सर्व प - कारच्या रेशनकार्डधारकांसाठी मोफत मिळणार आहेत. वेंगुर्ले, कुडाळ, देवगड, कणकवली, मालवण व कोल्हापूर इत्यादी ठिकाणी नोंदणी व तपासणी सेंटर सुरू केले असून वेंगुर्ले येथे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.