जिल्ह्यात १४४ केंद्रावर मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्रांचा शुभारंभ
राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पुढाकार
ओटवणे प्रतिनिधी
राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आयोजित केलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी असून ही परीक्षा दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी केले. राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने गुरुवारी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विदयार्थ्यांना १४४ केंद्रावरील मोफत जिल्हास्तर शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्रांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.माडखोल केंद्र शाळा नं. १ येथे सुरु केलेल्या या मोफत जिल्हास्तर शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्राथमिक उपशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, पतपेढी संचालक नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, तालुकाध्यक्ष समीर जाधव, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, मुख्याध्यापक रश्मी सावंत, सतीश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी धनंजय मेंगाणे यामी शिष्यवृत्ती परीक्षा हा शासनमान्य स्पर्धा परीक्षेचा एक अभिनव उपक्रम असून यात गुणवत्ताधारक मुले ठरविले जातात. ही गुणवत्ता म्हणजे शैक्षणिक कार्याचा आदर्श ठरविला जातो. त्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा हा शैक्षणिक उपक्रम गुणवत्तेचा आदर्श असल्याचे सांगितले.यावेळी विठ्ठल गवस यांनी शालेय मुलांसाठी स्पर्धा, यश, गुणवत्ता, सराव आणि शैक्षणिक प्रगती म्हणजे नवभारताची दर्जात्मक गुणवत्ता आहे. यासाठीच विद्यार्थी गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीने विविध शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी राजन कोरगावकर, कल्पना बोडके, नामदेव जांभवडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.