सातार्डा पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार
घराच्या पडवीतील कुत्र्यावर बिबट्याची झडप ; बिबट्याला जेरबंद करा ; ग्रामस्थांची मागणी
सातार्डा /वार्ताहर
सातार्डा पंचक्रोशीमध्ये बिबट्याचा लोकवस्तीच्या ठिकाणी मुक्त संचार सुरु आहे. गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान घोगळवाडी येथील पंकज मेस्त्री यांच्या घराच्या पडवीतील कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.घोगळवाडी, देऊळवाडी, मेसवाडी परिसरात बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. घोगळवाडीतील आपा पारिपत्ये, कृष्णा सातार्डेकर, नितीन मांजरेकर यांचे कुत्रे बिबट्याने फस्त केले आहेत. काही वासरांवर बिबट्याने झडप घातली आहे. मडूरा येथील सिध्येश भाईप या तरुणाला दुचाकीने गोव्यात जाताना उत्तम स्टील कंपनीच्या भागात बिबट्या नजरेस पडला होता.
रेस्क्यू टीमची गस्त
पंचक्रोशीत उपद्रव करणारा वयस्कर बिबटयाच असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी उल्हास कांबळी यांना बिबटया दिसला होता. त्यांनी बिबट्याला पळवून लावले होते. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्री कांबळी यांची भेट घेतली होती.बुधवारी रात्री वनविभागाच्या रेस्कयू टीमकडून उत्तम स्टील कंपनीच्या परिसरात गस्त ठेवण्यात आली होती. तरीही गुरुवारी पहाटे बिबट्याने श्री मेस्त्री यांच्या पडवीतील कुत्र्यावर झडप घालून नेला.
ग्रामस्थांमध्ये भीती
लोकवस्तीत घुसून गायीची वासरे, कुत्रे फस्त केले जात असल्याने बिबट्याची दहशत वाढली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोपा विमानतळ तसेच गोवा राज्यात विविध कंपन्यांमध्ये, हॉस्पिटलात शिफ्टमध्ये काम करण्यासाठी पंचक्रोशीतील तरुण, तरुणी, महिला रात्रीच्यावेळी घराबाहेर येतात, जातात.ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.वनविभागाने बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.