होनगा येथील पाळलेल्या डुकरांच्या मुक्त संचारामुळे उपद्रव वाढला
ग्रामपंचायतीने बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर/काकती
होनगा येथील पाळलेल्या डुकरांच्या मुक्त संचारामुळे मोठा उपद्रव वाढला आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामस्थांचे जीवन जगणे देखील असह्या झाले आहे. संबंधित ग्रामपंचायत व शासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून होनगा गावात या डुकरांचा मुक्त संचार असून, गटारीतील घाणीत तोंड घालून इकडे-तिकडे धुमाकूळ घालत फिरत आहेत. घरच्या परड्यात ठेवलेल्या पाण्याच्या बादल्या, भांड्यांमध्ये तोंड घालून पाणी पित आहेत. पाठीमागून घरात प्रवेश करून स्वयंपाकाच्या भाड्यांतही तोंड घालत असल्याचे दिसत आहे. परड्यात ठेवलेले पिंजर, ओला चारा यात लोळत आहेत. यामुळे सर्वत्र घाणीच्या प्रसारासोबत डासांचे प्रमाणही वाढत आहे. यावर्षी सतत पाऊस असल्याने भात, मका, पिकातूनही ही डुकरे धुडगूस घालत आहेत. सध्या भाताच्या पिकात दाणे भरले असून पंधरवड्यात भात सुगी हंगामाला सुरुवात होणार आहे. भात पिकात ही डुकरे वावरत असल्याने भाताचे लोंब झडत आहेत.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
या डुकरांच्या वावरामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जुलै महिन्यात डासांच्या पादुर्भावामुळे डेंग्युची साथ वाढली होती. शाळकरी मुलीला डेंग्युच्या साथीने जीव गमवावा लागला होता. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डुकरांना पकडून हद्दपार करण्यासाठी उपाययोजना करावी. यापूर्वी अनेकवेळा होनगा ग्रा. पं.ने जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती. मात्र याकडे दुर्लक्षित केले आहे. परिणामी ग्रामस्थ उग्र आंदोलन छेडतील, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.