गर्भवतींसाठी दर महिन्याला दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी
राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मातृत्व सुरक्षा अभियान
बेंगळूर : गर्भवती महिलांच्या आरोग्यहितासाठी आरोग्य खाते राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘मातृत्व सुरक्षा अभियान’ राबविण्याची योजना आखत आहे. दर महिन्याला 9 आणि 24 तारखेला गर्भवतींची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. बुधवार 22 जानेवारी रोजी रायचूरमधील माता आणि बाल रुग्णालयात गर्भवतींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव हे या अभियानाला चालना देतील. अलीकडे सरकारी इस्पितळांमध्ये बाळंतिणींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची आरोग्य खात्याने गांभीर्याने दखल घेतली आहे. मातृत्व सुरक्षेवर अधिक भर देण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. राज्यातील माता आणि बाल रुग्णालयांमध्ये गर्भवतींसाठी दर महिन्याला दोनदा मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दर्जेदार आरोग्य सेवेचे उद्दिष्ट
मातृत्व सुरक्षा अभियानात गर्भवतींना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य खात्याने दर्जेदार प्रसूती सेवा प्रदान करणे, सुरुवातीला एएनसी नोंदणी, गर्भधारणेच्या तीन महिले अगोदर आणि गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत फॉलिक अॅसिडच्या गोळ्या देणे, गर्भधारणेच्या 14 व्या आठवड्यापासून प्रसूती आणि 6 महिन्यानंतरच्या कालावधीत 500 मायक्रोग्रॅम कॅल्शियम देणे, गर्भावस्थेच्या मधुमेहासाठी ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (ओजीटीटी) वापरून सक्तीने तपासणी करणे, प्रत्येक भेटीवेळी रक्तदाब व वजन तपासणी करणे, प्रसूतीची लक्षणे आणि धोक्यांच्या चिन्हांबाबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जागरुकता वाढविणे, प्रत्येक महिन्याच्या 9 आणि 24 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियानांतर्गत प्रसूती व स्त्राrरोग तज्ञांकडून तपासणी करून आवश्यक उपचार केले जातील. गर्भधारणेदरम्यान पौष्टिक गरजांबद्दल गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामीण आरोग्य पोषण दिवस आयोजित केले जातील. आपत्कालिन परिस्थितीत कोठे जावे, कशी व्यवस्था करावी, याबाबत सल्ले दिली जातील. यासह विविध प्रकारच्या सेवा या अभियानांतर्गत पुरविल्या जाणार आहेत. यामुळे गर्भवतींना आरोग्यहित जपण्यास अनुकूल होईल.