न्हावेली पंचक्रोशीत मोफत पाच दिवसीय योगशिबिर
न्हावेली /वार्ताहर
न्हावेली पंचक्रोशीतील नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने निःशुल्क संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ११ जानेवारी २०२६ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत न्हावेली येथील सदगुरू हॉल, मोर्ये सर निवास (सोनुर्ली तिठा) येथे दररोज सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत होणार आहे. या योगशिबिरामध्ये योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात येणार असून शरीर रोगमुक्त ठेवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, वजन नियंत्रणात ठेवणे, ताणतणावातून मुक्तता, पचनक्रिया सुधारणे तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी योगाचे महत्त्व विशद करण्यात येणार आहे. योगसाधकांच्या उपस्थिती व मागणीनुसार हे शिबिर पुढे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. हे शिबिर पतंजलि योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, युवा भारत, महिला पतंजलि समिती व पतंजलि किसान सेवा समिती (जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र – पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. लहान मुले, युवक, महिला, पुरुष अशा सर्व वयोगटांसाठी हे शिबिर खुले असून प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ‘अधिकृत प्रमाणपत्रधारक योगशिक्षक कसे व्हावे’ याबाबत मार्गदर्शनही या शिबिरात मिळणार आहे.शिबिरात सहभागी होण्यासाठी योगा मॅट/चादर/चटई, हातरुमाल व पाणी बॉटल सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी श्री.मोर्ये (९७६३५१५६९५), श्री.योगेश येरम (९४२१२६८८३०) व श्री विद्याधर पाटणकर (९४०४१६९८५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.