आधारलिंक असलेल्या शेतकऱ्यांनाच मोफत विजेची सुविधा
30 सप्टेंबरपर्यंत मुदत
बेळगाव : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोफत थ्री फेज विद्युतपुरवठा केला जातो. योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने कृषीपंपांना आधार नोंदणी सक्तीची केली. मागील दोन महिन्यांपासून बेळगावसह संपूर्ण राज्यात आधार नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. ज्या ग्राहकांनी आधारलिंक केले आहे, त्यांनाच यापुढे शेतीसाठी मोफत वीज दिली जाणार आहे.
बेळगाव शहरात 660, बेळगाव तालुक्यात 22,979 तर खानापूरमध्ये 21,342 कृषी पंपसेट आहेत. या पंपसेटना रोज किमान 6 तास मोफत वीजपुरवठा केला जातो. वीजबिलाची रक्कम राज्य सरकारकडून हेस्कॉमला दिली जाते. बेळगाव जिल्ह्यात 96 टक्के शेतकऱ्यांनी आधारलिंक प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु अद्याप 4 टक्के शेतकऱ्यांची आधारलिंक अपूर्ण आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वारसदारांची नावे मीटरवर न चढविल्याने प्रक्रिया उशिराने करावी लागत आहे.
या पुढील काळात ज्या शेतकऱ्यांनी आधारलिंक केले आहे, त्याच शेतकऱ्यांना मोफत विजेची सुविधा मिळणार आहे. शेतकऱ्यांना 10 एचपीपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जातो. परंतु बऱ्याचशा ठिकाणी बेकायदेशीर पंपसेटदेखील सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण राज्यभर आधार जोडणी करण्यात येत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून त्यापूर्वी आधारलिंक करून घेणे गरजेचे आहे.
मोफत विजेचा लाभ मिळण्यासाठी आधारलिंक गरजेचे
शेतकऱ्यांना मोफत विजेचा लाभ मिळण्यासाठी आधार जोडणीची सक्ती करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील 22,979 पैकी 22,380 शेतकऱ्यांनी आधार जोडणी केली आहे. तर खानापूर तालुक्यात 21,342 पैकी 20,225 शेतकऱ्यांनी आधारलिंक प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी आधारलिंक करावे.
- विनोद करुर (कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)