मुलींच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी कधी? शिक्षण संस्थांकडून लेखी आदेश नसल्याचे उत्तर
शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेश प्रक्रियेत मुलींनाही प्रवेश शुल्क
अहिल्या परकाळे कोल्हापूर
राज्यातील सर्व मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मेडिकल, इंजिनिअरिंगसह उच्च शिक्षण मोफत दिले जाणार, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सध्या प्रवेश घेण्यासाठी गेलेले पालक मोफत प्रवेश देण्याची मागणी करीत आहेत. आम्हाला लेखी आदेश आले नाहीत, असे उत्तर शिक्षण संस्थांकडून दिले जात आहे. त्यामुळे मुलींना मोफत शिक्षण या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे पदवी, पदव्युत्तर, इंजिनिअरिंग, मेडीकल, फार्मसी आदी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश घेण्यासाठी हजारो रूपये प्रवेश शुल्क भरण्याच्या सुचना केल्या जात आहेत. सरकारच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी जून महिन्यापासून ‘सरकारच्या वतीने फ्री एज्युकेशन स्किम फॉर गर्ल्स इन महाराष्ट्रा’ या योजने अंतर्गत 800 पेक्षा जास्त अभ्यासक्रमांचे शिक्षण मुलींना मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आम्ही प्रवेश शुल्क भरणार नसल्याचे उत्तर पालकांकडून दिले जात आहे. मुलींना मोफत शिक्षण असतानाही तुम्ही पैसे कसे मागता? असा सवाल करीत पालक व विद्यार्थी शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. एवढ्यावरच पालक थांबत नसून तुम्ही प्रवेश शुल्काच्या नावाखाली पैसे उकळता काय? असा जाबही पालकांकडून विचारला जात आहे. परिणामी पालकांना तोंड देता-देता शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी पारंपारिकसह व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश शुल्क पालकांच्या खिशाला परवडणारे नाही. तरीदेखील आपल्या मुलीला चांगले शिक्षण देवून तिचे जीवन सुखकर व्हावे, यासाठी पालक कर्ज काढून व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. ऐवढे करूनही नोकरी मिळण्याची शाश्वती असेलच असे नाही. नोकरी मिळालीच तर कितीचे पॅकेज मिळणार यावर पुढील भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना व्यवसायिक अभ्यासक्रमाचे उच्च शिक्षण घेणे परवडणारे नाही. यावर पर्याय म्हणूनच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागतच झाले. परंतू प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेत अंमलबजावणी झाली नसल्याचे पालकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
आचार संहिता असल्याने घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही
मुलींना मोफत उच्च शिक्षण देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी केली. परंतू आचार संहिता असल्याने अंमलबजावणीचा आदेश काढता आला नाही. असे असले तरी शिक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आचारसंहितेचे कारण सरकारने पुढे करू नये, असा सूर पालकांचा आहे.
प्रवेश घेताना भरलेले प्रवेश शुल्क परत मिळणार का?
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी मुलींना मोफत शिक्षण अशी घोषणा केली होती. प्रवेश घेण्यासाठी गेले असता, शिक्षण संस्थांकडून आमच्याकडे लेखी आदेश आलेला नाही असे उत्तर दिले जाते. मग या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार. प्रवेश घेताना भरलेली प्रवंश शुल्क अंमलबजावणीचा आदेश आल्यानंतर परत मिळणार का?
सचिन बरगे (पालक)
आचारसंहितेनंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णयाची शक्यता
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे 4 जूननंतर होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीतही अंमलबजावणीचा आदेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आली.