राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास
डी. के. शिवकुमार यांची घोषणा : लवकरच अर्ज मागवणार
बेंगळूर : कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेताच डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी रात्री विद्यार्थी समुदायाला खूशखबर दिली. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत बसपास वितरित करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवकुमार यांनी बुधवारी सायंकाळी आपल्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत बसपास वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पत्रकार परिषद घेत निर्णयांची माहिती दिली. राज्यात यापुढे विद्यार्थिनींप्रमाणे विद्यार्थ्यांनाही मोफत बसपास वितरण केले जाईल.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून लवकरच मोफत बसपास वितरण करण्यासाठी अर्ज मागविले जातील, असे त्यांनी सांगितले. यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनुकूल होणार आहे. त्याचप्रमाणे बेरोजगार समस्या निवारण, रस्ते निर्माणासाठी 2000 कोटी रुपये दिले जातील तसेच 2,500 चौ. फूट विस्तीर्णपर्यंतच्या इमारतींना ओसीपासून सूट देण्यात येईल. बेंगळूरप्रमाणे बी खाता असणाऱ्या इमारतींसाठी ए खाता देण्याची योजना राज्यभरात विस्तारण्यात येईल, अशी घोषणा ही शिवकुमार यांनी केली. खासगी संस्थांमध्ये रोजगार शोधणाऱ्यांना प्रायव्हेट एम्लॉयमेंट एक्स्चेंच सेंटर स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भारत जोडो संघाला 10 लाख रु.
युवा समुदायात नेतृत्वगुणांचा विकास करण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीत ‘भारत जोडो युवक संघ’ स्थापन करण्याचा विचार आहे. राज्यभरात एकूण 10 हजार युवा संघ स्थापन करण्यात येतील. प्रत्येक भारत जोडो युवक संघाला सरकारकडून 10 हजार रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणाही नवे मुख्यमंत्री शिवकुमार यांनी केली.