महिलांना मोफत बस, महिन्याला 3 हजार रुपये
राहुल गांधी यांच्याकडून 5 मोठ्या घोषणा : ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्य नेत्यांची उपस्थिती
मुंबई :
राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना 3000 रुपये दरमहा देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी केलेल्या 2100 रुपयांपेक्षा 900 रुपये जास्त रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांन मोफत बसप्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. लोकसेवेची पंचसुत्री म्हणत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन आज महायुतीचा विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राचे आणि मुंबईकरांचे उद्योग हिसकावून शेजारच्या राज्यात पाठवले जात आहेत. सेमी कंडक्टर, आयफोन, टाटा असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रांपासून हिसकावून गुजरातला नेले. सध्या तुम्हाला विविध योजनेच्या माध्यमातुन पैसे देण्याचे सांगण्यात येते, मात्र महागाई वाढली असून गॅस सिलेंडर पेट्राल डिझेलचे दरही वाढले आहेत. दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाकडून 90 हजार हिसकावून अदानी अंबानीला दिले जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना : शरद पवार
दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीही नव्हती. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. तर शिवछत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत लोकसभेवेळी लोकांनी दिलेल्या ताकदीमुळे आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीतील किस्सा सांगत मनमोहन सिंग यांचे सरकार असताना पवार यांच्याकडे कृषी खाते होते, त्यावेळी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. आता देखील आघाडी सरकार आल्यावर कृषी समृद्धी योजना राबवली जाणार असून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार. कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांला 50 हजार आर्थिक मदत दिली जाणार आहे. बळी राजाला वाच]िवण्यासाठी कृषी समृद्धी योजना राबवणार. बळीराजाला संरक्षण देणारे सन्मान देणारे सरकार निवडून द्या. तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचे आश्वासन यावेळी महाविकास आघाडीकडून पवार यांनी दिले.
मुंबईचे गुजरातीकरण करण्यापासून वाचवा : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवत म्हणाले की, महाराष्ट्रात योजनाचा पाऊस मात्र दुसरीकडे अंमलबजावणीचा दुष्काळ हा दिसत असून मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनावश्यक गोष्टींचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. आता तर आनंदाच्या शिद्यात उंदराच्या लेंड्या मिळतात. मात्र आघाडी सरकार आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. तसेच पंचसुत्री कार्यक्रम पाच सुत्रांपुरती मर्या]िदत नसून वचननामा अद्याप बाकी असल्याचे ठाकरे म्हणाले. यानुसार मुलांना कौशल्य विकास ज्ञान, बेरोजगार तऊणांना दर महिन्याला 4 हजार ऊपयाची मदत आघाडी सरकार करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम :
1)राज्यातील शेतक़ऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार ऊपयांचे प्रोत्साहन
2)युवकांना प्रतिमहिना 4 हजार ऊपये
3)कुटूंब रक्षण योजनेत 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषध देणार.
4)महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 ऊपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
5)जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.