For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलिसांच्या नावे पैसे मागण्याचा प्रताप

05:39 PM Jul 24, 2025 IST | Radhika Patil
पोलिसांच्या नावे पैसे मागण्याचा प्रताप
Advertisement

आटपाडी :

Advertisement

पोलिसांच्या कारवाईची भिती दाखवुन पैसे उकळण्याचा अजब प्रकार आटपाडी तालुक्यात उजेडात आला आहे. मृत मुलीच्या प्रकरणात कारवाई नको असेलतर पोलीसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून एका तरूणाकडे पैशाची मागणी करणारे कॉल रेकॉर्डीग व्हायरल झाले आहे. त्यामुळे करगणीसह आटपाडी तालुक्यात खळबळ माजली आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून समाजमन सुन्न करणाऱ्या घटना घडल्या आहेत. पण, या घटनांच्या आडुन राजकारणही जोमाने सुरू आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये करगणीतील मृत मुलीच्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत एकमेकांविरोधात निवेदन देण्यात आले आहे.

Advertisement

भाजपने आमदार सुहास बाबर यांचे कॉल रेकॉर्डिंग काढण्याचे तर शिवसेनेने आमदार गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर यांचे कॉल रेकॉर्डिंग काढण्याची मागणी केली. त्यामुळे पिडीत मृत मुलीच्या विषयावरून राजकीय रंगत वाढल्याचे चित्र आहे.

हे सर्व होत असताना करगणीतील विषयावरून दोन तरूणांमधील मोबाईलवरील संवादाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. पिडीत मृत मुलीच्या प्रकरणातील यापुर्वी आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या एका तरूणाने पोलीस कारवाईतुन वाचण्यासाठी समोरच्या तरूणाकडे थेट पैशाची मागणी केल्याचे या संवादातुन स्पष्ट झाले आहे. मृत मुलीच्या प्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या चार तरूणांचे नातेवाईक ३० ते ४० लाख देण्यास तयार होते. परंतु आम्ही ते घेतले नाहीत. असा दावा संबंधित व्यक्ती या संभाषणात करत आहे. 'मी सर्व प्रकरण थांबवतो. ५० हजार तात्काळ द्या. त्यातील २० हजार आजच द्या. माझ्या शब्दाला इज्जत नाही तर मी साहेबांना, हवलदारांना काय बोलु?' असा सवाल पैसे मागणारी व्यक्ती करत आहे. तुमच्याकडे पैसे येतील तसे द्या. मी साहेबांना सांगतो, असे म्हणणाऱ्या व्यक्तीला समोरची व्यक्ती मी कामाला जावुन जमेल तसे पैसे देतो. मी पन्नास हजार देवु शकत नाही, असे शपथेवर सांगत आहे.

पन्नास हजारापासुन सुरू झालेली ही मागणी नंतर कमी केल्याचा संवाद असुन ज्याच्याकडे पैसे मागणी करण्यात आली आहे तो तरूण इतके पैसे देण्याऐवजी 'फास लावुन घेतलेला बरे' असे म्हणत आहे. शेवटी ४० हजार द्या, मी साहेबांना सांगतो, असे स्पष्ट करत वाचविण्यासाठी टप्याटप्याने पैसे द्या. चौकशी हवलदाराकडे आहे. मी त्यांना सांगतो. असे पैशाची मागणी करणारा म्हणत असल्याचे संभाषणामध्ये स्पष्ट आहे.

तर ज्याच्याकडे पैशासाठी तगादा सुरू आहे तो गयावया करत इतकी मोठी रक्कम आपल्याला शक्य नसल्याचे सांगत आहे. आभाळ कोसळलेल्या मृत मुलीच्या कुटुंबिय, नातेवाईकांप्रती सहानभुती दर्शवत, लढे, आंदोलनात पुढाकार घेवुन सक्रिय होणाऱ्या काहीजणांकडुन अर्थकारणही सुरू असल्याचे रेकॉर्डिंगवरून स्पष्ट झाले आहे. ही बाब वेदनादायी आणि संतापजनक असुन मुलीच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यांइतकेच या प्रकरणावरून मलई खाण्यासाठी धडपडणारेही दोषी आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुखांनी या संभाषणाची सत्यता पडताळुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

  • महेशभाऊ आणि संभा नावाचा उल्लेख...

व्हायरल होत असलेल्या या संवादामध्ये 'महेशभाऊ' आणि 'संभा' अशी दोन नावे सातत्याने उच्चारली गेली आहेत. त्यामुळे पोलीसांच्या नावाने प्रकरणातुन बाजुला ठेवण्यासाठी पैशाची मागणी करणारे हे महाभाग कोण? याचाही तपास पोलीसांना करायला लागणार आहे. मुळात करगणीतील पिडीत मृत मुलीच्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईची मागणी होत असतानाच या घटनेची पाळेमुळे शोधावी लागणार आहेत. आणखी काही धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच पोलीस कारवाईपासुन बाजुला ठेवण्यासाठी काही तरूणांना पैशाची मागणी करणारेही महाभाग चर्चेत आले आहेत.

Advertisement
Tags :

.