परताव्याच्या बहाण्याने फसवणूक
सातारा :
केवळ 45 दिवसांच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास त्या रकमेच्या दुप्पट रकमेचे सोने मिळणार असल्याचे आमिष दाखवून महिलेची सुमारे 9 लाख 10 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी धन्यकुमार गोरख माने, शरयू धन्यकुमार माने (रा. संगमनगर सातारा), प्रतीक्षा सिद्धार्थ गडांकुश (रा. चिंचणेर ता. सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात अनुराधा विशाल लोहार (वय 27, रा. बनघर, ता. सातारा) यांना धन्यकुमार माने, शरयू माने व प्रतीक्षा गडाकुंश यांनी 45 दिवसांच्या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. त्या गुंतवलेल्या रकमेवर दुप्पट रकमेचे सोने देण्याचे आमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून अनुराधा लोहार यांनी वेळोवेळी 9 लाख 10 हजार रूपयांची गुंतवणूक केली. योजनेत दिलेली मुदत पूर्ण होऊनही अद्याप परतावा दिलेला नाही. याची विचारणा केल्याने काहीही माहिती न देता पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आहेत. ही बाब लक्षात येताच अनुराधा यांनी तिघांविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.