ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगून 45 लाखांची फसवणूक
टिळकवाडी येथील महिलेला गंडा : गुजरात येथील एका विरोधात गुन्हा दाखल
बेळगाव : ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतविल्यास 90 दिवसांत 200 टक्के नफा मिळवून देऊ, असे सांगून सावरकर रोड टिळकवाडी येथील एका महिलेला 45 लाख रुपयांना ठकविण्यात आले. मोनिका प्रशांत सावंत (वय 51) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी उमेश कांतीलाल पटेल राहणार अहमदाबाद, गुजरात याच्याविरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे.
फिर्यादी मोनिका यांच्या परिचयातील नितीन अशोक माडगूत यांनी वसंत गेंधळी रा. मुंबई हा माझ्या ओळखीचा आहे, तो मला असेट बूल आयकॉन लिमिटेड शेअर्स ऑन लाईन ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगून चांगला नफा मिळतो, असे सांगत आहे, असे फिर्यादीला सांगितले. त्यानंतर फिर्यादी आणि नितीन यांनी अजित गोंधळी यांच्याकडे कंपनीबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सदर कंपनी उमेश कांतीलाल पटेल हे यूपी 2 कन्सल्टन्सी या नावाने शेअर्स ऑनलाईन ट्रेडिंग चालवितात व त्यांचे कार्यालय अहमदाबाद येथे आहे, असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी आणि नितीन हे 4 ऑगस्ट 2022 रोजी अहमदाबादला गेले. यूपी 2 कन्सल्टन्सी ऑफिसला गेल्यानंतर तेथे अजितने उमेश पटेलचा परिचय करून दिला. उमेशने असेट बुल आयकॉन लिमिटेड ट्रेडिंग कंपनीत रक्कम ठेवल्यास 40 दिवसांत 100 टक्के नफा मिळवून देऊ आणि 90 दिवसांत 200 टक्के नफा मिळवून देऊ, असे सांगितले. फिर्यादीने मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग (एमओयू) केला. उमेश पटेलने यूपी 2 कन्सल्टन्सीच्या नावाने दिलेल्या बँक अकौंटवर फिर्यादी मोनिका यांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3.19 च्या दरम्यान 40 लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून पाठविले.
त्यानंतर 29 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी पुन्हा 5 लाख रु. आरटीजीएसच्या माध्यमातून पाठविले. मात्र अद्याप उमेश पटेल यांनी गुंतविलेली रक्कम व नफा न देता फसवणूक केली. त्यामुळे संबंधितांविरोधात कारवाई करून न्याय द्यावा, असे मोनिका यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक परशराम पुजारी तपास करीत आहे.