जादा परताव्याच्या आमिषाने 42 लाखांची फसवणूक
कोल्हापूर :
शेअर मार्केटमधून दरमहा चांगला परतावा देण्याच्या अमिषाने केबल ऑपरेटरची 41 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी वैभव कृष्णात पाटील (35) आणि कृष्णात बापूसो पाटील (दोघे रा. पाडळी खुर्द) या पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला. जून ते ऑगस्ट 2021 दरम्यान फसवणूकीचा हा प्रकार घडला. याबाबत केबल ऑपरेटर सचिन आनंदा पाटील (वय 43, रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी) यांनी रविवारी (दि. 2) रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, केबल ऑपरेटर असणारे सचिन पाटील यांची केबलच्या कामातून कृष्णात पाटील याच्याशी ओळख झाली. त्याने मुलगा वैभव याच्याशी सचिन यांची ओळख करून दिली. या दोघांनी दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सचिन यांच्याकडून जून ते ऑगस्ट 2021 या तीन महिन्यांत 44 लाख 35 हजार रुपये धनादेश आणि आरटीजीएसद्वारे घेतले. तिसऱ्या महिन्यात परताव्याचे अडीच लाख रुपये दिले. यानंतर मात्र या दोघांनी परतावा देणे बंद केले. सचिन पाटील यांनी याबाबत दोघांकडे वारंवार विचारणा केली. मात्र परताव्याचा एकही हप्ता आणि मुद्दल ही दिली नाही. वारंवार मागणी करूनही त्यांनी टाळाटाळ केल्याने अखेर सचिन यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार अर्ज दिला. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
धनशांती मल्टी ट्रेडर्स प्रकरणासह आणखीन गुन्हे
संशयित वैभव पाटील याने अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे. दोन वर्षांपूर्वी मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या धनशांती मल्टी ट्रेडर्सच्या गुह्यात तो पसार होता. त्याच्यावर मुरगूड, पेठवडगाव, कडेगाव, सांगली पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आता त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला आठवड्यापूर्वी अटक करून मुरगूड पोलिसांच्या ताब्यात दिले. आता जुना राजवाडा पोलीस वैभव पाटील याला ताब्यात घेणार आहेत.