फसवणुकीचे प्रकार सुरूच
कार खरेदीत डॉक्टरला तर ऑनलाईन गेममध्ये तरुणाला गंडा
बेळगाव : फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. अलिशान कार खरेदी व्यवहारात एका डॉक्टरची फसवणूक झाली आहे. तर ऑनलाईन गेमच्या माध्यमातून एका युवकाला गंडा घालण्यात आला आहे. सायबर क्राईम विभागात या दोन्ही प्रकरणांची नोंद झाली आहे. डॉ. गिरीष सोनवालकर यांना 35 लाख 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. गुरुग्राम हरियाणा येथील आसिम पुपनेजा याच्याविरुद्धात शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आसिम पुपनेजा याने बीएमडब्ल्यू कार विकायची आहे अशी जाहिरात फेसबुकवर घातली होती.
त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून डॉ. गिरीष यांनी कार खरेदी संबंधी चर्चा केली. गुरुग्रामला जाऊन कार बघितली. सुरुवातीला 24 सप्टेंबर 2025 रोजी 50 हजार रुपये देऊन कार खरेदीचा व्यवहार ठरविण्यात आला. एकूण 35 लाख 90 हजार रुपये देऊन कार खरेदी करण्यात आली. खरेदी केल्यानंतर ही कार अनेक दिवस पाण्यात उभी असल्यामुळे खराब झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे आसिम विरुद्ध शहर सायबर क्राईम विभागात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.
तरुणाला 40 लाखाचा गंडा
ऑनलाईन गेमिंग अॅपच्या माध्यमातून गणेशपूर येथील एका तरुणाला 40 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. या संबंधी दीपक नामक तरुणाने सायबर क्राईम विभागात फिर्याद दिली आहे. 21 नोव्हेंबर 2023 ते 14 जानेवारी 2026 या वेळेत त्याला 40 लाख 3765 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. फेसबुकवर जाहिरात बघून ऑनलाईन गेम खेळताना त्यांनी सांगेल त्या प्रमाणे रक्कम डिपॉझिट करून हा तरुण फशी पडला आहे.