For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सची घोडदौड चालूच, पॅराग्वेवर एका गोलने मात

06:56 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सची घोडदौड चालूच  पॅराग्वेवर  एका गोलने मात
Advertisement

वृत्तसंस्था, फिलाडेल्फिया : पॅराग्वेविरुद्धच्या सामन्यात अखेरीस एमबाप्पेनेच बाजी मारून त्याने आपल्या कारकिर्दीतील 19 वा विश्वचषक गोल केला. त्याच्या जोरावर प्रचंड उष्णतेचा सामना करत फ्रान्सने पॅराग्वेचा 1-0 असा पराभव केला आणि सलग चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

Advertisement

आता फ्रान्सचा सामना गुऊवारी मॅसॅच्युसेट्समधील फॉक्सबरो येथे मोरोक्कोशी होणार आहे. कतारमध्ये झालेल्या 2022 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला होता. तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास असताना आणि सामन्यादरम्यान प्रचंड उष्णतेचा इशारा असतानाही एमबाप्पेने 70 व्या मिनिटाला पेनल्टी किकद्वारे गोल करत पॅराग्वेच्या शारीरिक ताकदीवर भर देणाऱ्या आणि बचावात्मक खेळणाऱ्या संघाविऊद्ध यश मिळवले.

फ्रान्ससाठी हा एक गोल पुरेसा ठरला. व्हिडिओ रिह्यूमध्ये दिएगो गोमेझने प्रतिस्पर्धी खेळाडूला पाय अडवून पाडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एमबाप्पेला पेनल्टी मिळाली. त्यानंतर, धावत जाऊन चेंडूला फटकावण्यापूर्वी त्याने आपल्या हालचालीत क्षणभर खंड पाडला आणि गोल केला. विश्वचषकातील 19 सामन्यांमधील हा त्याचा 19 वा गोल आहे. तो आता अर्जेंटिनाच्या लायोनेल मेस्सीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक विश्वचषक गोलांपेक्षा एका गोलने मागे आहे.

Advertisement

दुसऱ्या सत्रामध्ये एमबाप्पेला गोल करण्याची मोकळी संधी साधता आली नाही. तसेच त्याच्या काही क्षण आधी उस्मान डेम्बेलेच्या धडकेमुळे जाळीत आदळलेल्या मानू कोनेचा गोलच्या वरच्या कोपऱ्याच्या दिशेने मारलेला फटका पॅराग्वेचा गोलरक्षक गिलने अडवला. दुसऱ्या सत्राच्या अतिरिक्त वेळेतही गिलने एमबाप्पेचे गोल करण्याचे दोन जोरदार प्रयत्न हाणून पाडले.

फ्रान्सने स्पर्धेच्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये 13 गोल केले होते, पण सामन्याचे रूपांतर धुसमुसळ्या खेळात करू पाहणाऱ्या पॅराग्वे संघाने त्यांना पहिल्या सत्रामध्ये रोखले. आंद्रेस कुबासने एमबाप्पेला खाली पाडल्यावर तणाव वाढला आणि दोन्ही संघांनी काही काळ एकमेकांना धक्काबुक्की केली. मातियास गालार्झानेही आपला उजवा कोपर एमबाप्पेवर मारला आणि त्याला गवतावर आदळविले. सोमवारी जर्मनीला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून पॅराग्वेने पुढील फेरीत प्रवेश केला होता, जो या विश्वचषकातील सर्वांत मोठा धक्कादायक निकाल होता. पण फ्रान्सने त्यांना दाद न देता पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

एमबाप्पेचा असाही पराक्रम

या स्पर्धेत एमबाप्पे आणि मेस्सी या दोघांनीही प्रत्येकी सात गोल केले असून ते गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. एमबाप्पेने चार वर्षांपूर्वी हा पुरस्कार जिंकला होता, परंतु अंतिम सामन्यात मेस्सी आणि अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला होता. पॅराग्वेच्या खेळाडूंना वारंवार स्पॅनिश भाषेतून डिवचणाऱ्या एमबाप्पेने आता एक विशेष विक्रम नोंदवला आहे. तीन वेगवेगळ्या विश्वचषकांच्या बाद  फेरीत किमान तीन गोल करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

सामन्यात वारंवार घडले तणावपूर्ण क्षणांचे दर्शन

या सामन्यात पॅराग्वेच्या खेळाडूंनी चिथावणी देऊन फाउल घडवून आणण्याचा आणि भांडणे उकरून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा किलियन एमबाप्पेने ते हसण्यावर नेले. या सामन्यात खेळाडूंचा संयम सुटणे आणि तणाव निर्माण होणे हे दृश्य वारंवार पाहायला मिळाले. हा सामना संपल्याची शिट्टी वाजल्यानंतर पॅराग्वेचा गोलरक्षक ओर्लादो गिल याने खिलाडूवृत्ती दाखवत हस्तांदोलनासाठी आपला उजवा हात पुढे केला, पण एमबाप्पेने त्याकडे दुर्लक्ष करून चालत जाणे पसंत केले. त्याच्या या कृतीचा राग येऊन गिलने चेंडू थेट एमबाप्पेच्या जर्सीवरील ‘10’ क्रमांकावर भिरकावला.

Advertisement
Tags :

.