फ्रान्सचे गिक्वेल-डेलरू मिश्र दुहेरीत विजेते
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
2026 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत फ्रान्सच्या थॉम गिक्वेल आणि डेल्फिन डेलरू या जोडीने नवा इतिहास घडविताना मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी फ्रान्सची ही पहिलीच जोडी आहे.
मिश्र दुहेरीच्या खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सची पाचवी मानांकित जोडी गिक्वेल आणि डेलरू यांनी चीनची टॉप सिडेड जोडी फेंग झी आणि हुआंग पिंग यांचा 22-20, 19-21, 21-15, अशा गेम्समध्ये पराभव केला. हा चुरशीचा अंतिम सामना 80 मिनिटे रंगला होता. या लढतीत फ्रान्सच्या जोडीने पहिला गेम 22-20 अशा फरकाने जिंकल्यानंतर चीनच्या जोडीने आपल्या डावपेचात बदल करत दुसरा गेम 21-19 असा जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये फ्रान्सच्या जोडीने चीनच्या टॉप सिडेड जोडीचा 21-15 असा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत फ्रान्सच्या या जोडीने उपविजेतेपद मिळविले होते तर इंडोनेशिया आणि चायना सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धांमध्ये या फ्रान्सच्या जोडीने उपांत्य फेरी गाठली होती. गेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत फ्रान्सच्या या जोडीने कांस्यपदक मिळविले होते.