भारतीयांसाठी फ्रान्सची मोठी भेट
आता ट्रान्झिट व्हिसाशिवाय हवाई प्रवास करता येणार : भारताकडून निर्णयाचे स्वागत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, पॅरिस
फ्रान्सच्या विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त ट्रान्झिट सुरू करण्याच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे. फ्रान्स सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवास सुलभ होईल आणि लोकांमधील संपर्क वाढेल, असे भारताने म्हटले आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान ट्रान्झिट संदर्भात एक महत्त्वाचा करार झाला होता. हा निर्णय भारत-फ्रान्स भागीदारी अधिक मजबूत होत असल्याचे दर्शवतो. मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान नुकतेच विशेष जागतिक सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे.
फ्रान्सच्या विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त ट्रान्झिटच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो, असे एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता काढून टाकण्यावर एकमत झाले होते. फ्रेंच सरकारने आता या कराराची अंमलबजावणी केली असून फ्रान्समध्ये हवाई मार्गाने ये-जा करणाऱ्या भारतीय नागरिकांना यापुढे ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता भासणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ
फ्रान्सने घेतलेला हा निर्णय भारत आणि फ्रान्स यांच्यातील मजबूत भागीदारी दर्शवतो, असे रणधीर जयस्वाल म्हणाले. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या अलीकडील दौऱ्यात विशेष जागतिक सामरिक भागीदारीच्या स्तरावर नेण्यात आले. यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांमधील आणि लोकांमधील संबंध अधिक दृढ होतील. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत-फ्रान्स संबंधांना औपचारिकपणे विशेष जागतिक सामरिक भागीदारीचा दर्जा दिला होता. हा निर्णय द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण वळण ठरला आहे.
उच्चस्तरीय चर्चेदरम्यान घोषणा
ही घोषणा मुंबईतील लोक भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय चर्चेदरम्यान करण्यात आली. हा मॅक्रॉन यांचा भारताचा चौथा आणि देशाच्या आर्थिक राजधानीतील पहिलाच दौरा होता. एका सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार, नेत्यांनी संरक्षण, तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये एक व्यापक आराखडा सादर केल्यामुळे ‘होरायझन 2047’ या दूरदृष्टीप्रती त्यांची वचनबद्धता अधिक दृढ झाली. गेल्या आठवड्यात, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पॅरिसमध्ये फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासचिव मार्टिन ब्रायन्स यांच्यासोबत भारत-फ्रान्स परराष्ट्र कार्यालय संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवल्यानंतर काही दिवसांतच यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात आला.