फ्रान्सला मिळाला सर्वात युवा अन् समलैंगिक पंतप्रधान
गेब्रियल अट्टल यांची सरकारचे प्रवक्ते ते पंतप्रधानपदापर्यंत झेप
वृत्तसंस्था/ पॅरिस
34 वर्षीय गेब्रियल अट्टल हे फ्रान्सचे नवे पंतप्रधान झाले आहेत. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यंदा होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी हा मोठा फेरबदल केला आहे. गेब्रियल हे फ्रान्सचे सर्वात कमी वयाचे आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान ठरले आहेत. 2022 मध्ये सर्वात कमी वयाचे मंत्री म्हणून शपथ घेणारे गेब्रियल आतापर्यंत शिक्षण विभागाची जबाबदारी सांभाळत होते. गेब्रियल यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला आहे.
इमिग्रेशनच्या मुद्द्यावर राजकीय तणाव वाढल्याने एलिझाबेथ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर या पदाच्या शर्यतीत गेब्रियल यांच्यासोबत अनेकांची नावे सामील होती. परंतु अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून मंगळवारी गेब्रियल यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
फ्रान्सचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान होण्याचा विक्रम यापूर्वी डाव्या पक्षाचे नेते लॉरेंट फॅबियस यांच्या नावावर होता. फॅबियस हे वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. 1984 मध्ये फ्रेंकोइस मिटर्रैंड यांच्याकडून फॅबियस यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती.
अट्टल हे फ्रान्समधील आपण समलिंगी असल्याचे कबूल करणारे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांच्याविषयी 2018 मध्ये शाळेतील एका जुन्या सहकाऱ्याने माहिती उघड केली होती. अट्टल हे त्यावेळी मॅक्रॉन यांचे माजी राजकीय सल्लागार स्टीफन सेजॉर्न यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते.
मॅक्रॉन यांचा मोठा निर्णय
युरोपीय संसदेच्या निवडणुकीपूर्वी अध्यक्ष मॅक्रॉन हे स्वत:च्या पक्षाच्या बाजूने वातावरण निर्माण करू पाहत आहेत. याचमुळे एलिझाबेथ यांना हटवून पंतप्रधानपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. मॅक्रान यांनी फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्यावर मे 2022 मध्ये एलिझाबेथ यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती. सुमारे दोन वर्षांपर्यंत त्या या पदावर होत्या. हे पद भूषविणाऱ्या त्या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला ठरल्या होत्या. परंतु इमिग्रेशनच्या मुद्द्यावरील त्यांच्या निर्णयांमुळे राजकीय तणाव वाढल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.