For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सकडून स्वीडनचे आव्हान 3-0 ने संपुष्टात

06:38 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सकडून स्वीडनचे आव्हान 3 0 ने संपुष्टात
Advertisement

किलियन एमबाप्पेचे दोन, तर बारकोलाकडून एका गोलाची नोंद

Advertisement

वृत्तसंस्था, ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी : किलियन एमबाप्पे आणि फ्रान्सचा संघ सध्या जबरदस्त लयीत आहे. स्वीडनविऊद्धच्या सामन्यात एमबाप्पेने दोन गोल केले.  त्याच्या या कामगिरीच्या जोरावर फ्रान्स संघाने स्वीडनचा 3-0 असा पराभव केला आणि 16 संघांच्या फेरीमध्ये पॅराग्वेविऊद्धचा सामना निश्चित केला.

यादरम्यान, 53 व्या मिनिटाला ब्रॅडली बारकोलाने फ्रान्ससाठी गोल केला. सलग पाच विश्वचषक सामन्यांत तीन किंवा त्यापेक्षा जास्त गोल करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला आहे. सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या उद्देशाने फ्रान्सचा संघ 4 जुलै रोजी फिलाडेल्फिया येथे पॅराग्वेविऊद्ध खेळणार आहे. या सामन्यातील विजेता संघ पाच दिवसांनंतर फॉक्सबोरो, मॅसॅच्युसेट्स येथे कॅनडा किंवा मोरोक्कोविऊद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल.

Advertisement

विश्वचषकातील या दोन देशांमधील पहिल्याच सामन्यात फ्रान्सने स्वीडनच्या तुलनेत गोल करण्याच्या दृष्टीने 25-7 असे अधिक फटके हाणले. 32 व्या मिनिटाला एमबाप्पेचा शॉट गोलपोस्टला लागला आणि त्याने नाराजी व्यक्त करत दोन्ही हात वर केले. त्यानंतर चार मिनिटांनी फ्रान्स आघाडी घेण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, जेव्हा ओलिसेने ‘बायसिकल किक’च्या द्वारे पेनल्टी क्षेत्राच्या आतून गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फटकाही गोलपोस्टला धडकला.

गोलरक्षक जेकब विडेल झेटरस्ट्रॉमने ओलिसेचा शॉट गोलपोस्टच्या बाहेर वळवल्यानंतर एमबाप्पेने गोलाची नोंद केली. ओलिसेने ‘शॉर्ट कॉर्नर किक’वर उस्मान डेम्बेलेकडे चेंडू फटकावला आणि त्याने बायलाइनजवळ एमबाप्पेकडे चेंडू सोपवला. एमबाप्पेने व्हिक्टर ग्योकेरेसपासून बचाव करण्यासाठी ‘क्रॉसओव्हर स्टेप’ घेतली आणि ‘बॉक्स’च्या अगदी बाहेरून तिरपा फटका मारत चेंडू जाळीत सारला.

फ्रान्सच्या दुसऱ्या गोलाच्या वेळी गुस्ताफ लेगरबिएल्केने चेंडूवरील ताबा गमावला. ऑरेलियन चौमेनीने ओलिसेकडे चेंडू दिला. ओलिसेने लेगरबिएल्केच्या पायांमधून चेंडू काढला आणि बारकोलाने चेंडू घेत गोलरक्षक झेटरस्ट्रॉमच्या पसरलेल्या उजव्या हातावरून गोल केला. फ्रान्सच्या तिसऱ्या गोलच्या sिनर्मितीदरम्यान एमबाप्पेने बारकोलाला ‘बॅकहील पास’ देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 62 वा गोल ठरला. बारकोलाने ओलिसेकडे चेंडू दिला आणि त्याने तो पुढे सरकवला. त्याच वेळी एमबाप्पे वेगाने पेनल्टी क्षेत्रात धावला, चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि जोरदार फटका मारत गोल केला.

 एमबाप्पेकडून बाद फेरीत सर्वाधिक गोलांचा विक्रम

या विश्वचषकातील एका सामन्यात दोन गोल करण्याची एमबाप्पेची ही तिसरी वेळ आहे. तसेच या कामगिरीसह त्याने विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा स्वत:चा विक्रम प्रस्थापित केला. फ्रान्सच्या या 27 वर्षीय स्टार खेळाडूने 45 व्या मिनिटाला उत्कृष्ट ‘क्रॉसओव्हर स्टेप’चा वापर करून संघाला आघाडी मिळवून देणारा गोल केला. त्यानंतर 74 व्या मिनिटाला त्याने स्पर्धेतील आपला सहावा गोल नोंदवला आणि यंदा सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत लिओनेल मेस्सीशी बरोबरी केली. विश्वचषकातील एकूण 18 सामन्यांत त्याने 18 गोल केले आहेत. अर्जेंटिनाच्या मेस्सीचा विक्रम 29 सामन्यांत 19 गोल इतका आहे, ज्याच्यापासून एमबाप्पे केवळ एका गोलने मागे आहे.

Advertisement
Tags :

.