फॉक्सकॉनकडून 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीला मंजुरी
बेंगळूर : अॅपल आयफोन निर्मिती कंपनी फॉक्सकॉनने भारतामध्ये एक अब्ज डॉलरच्या गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकंदर 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक अॅपल फोन निर्मितीच्या कार्याकरीता केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अॅपल उत्पादनांच्या निर्मितीसाठी आगामी काळात कारखाना उभारला जाणार असून त्याकरिता ही गुंतवणूक महत्त्वाची ठरणार आहे. कर्नाटक सरकारला फॉक्सकॉनकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तैवानमधील कंपनी 70 टक्के आयफोन्सची जागतिक स्तरावर जोडणी करते आणि जागतिक स्तरावर ती सर्वात मोठी आयफोन कंत्राट निर्मिती कंपनी म्हणूनही ओळखली जाते. चीन बाहेर भारतामध्ये कर्नाटकात कंपनीचा कारखाना असून या अंतर्गत अॅपलची उत्पादने आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जाणार आहेत. या नव्या गुंतवणुकीच्या माध्यमातून उत्पादन कार्याला वेग येणार असून आगामी काळामध्ये 50 हजार जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.