Satara News: मानवी वस्तीत घुसून लांडग्याता हल्ला, 18 शेळ्यांसह एका गायीचा मृत्यू
खटाव तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारित झाले
पुसेगाव, बुध : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात डिस्कळ परिसरात वन विभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारित झाले आहे. रात्री अपरात्री हे प्राणी मानवी वस्तीत घुसून हल्ला करत आहेत. अनपटवाडी, पसूचा मळा, मांजरवाडी तसेच गारवडी भागात लांडग्याच्या हल्ल्यात सुमारे 18 शेळ्या आणि एक जर्सी गायीचा बळी गेला आहे.
एका जखमी शेळीला जीवदान देण्यात डिस्कळ पशु वैद्यकीय कर्मचाऱ्यांना यश आले आहे. दरम्यान, याबाबतचा वैद्यकीय अहवाल पाठवला असून वनविभागाच्यावतीने बाधित पशुपालकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त आहे.
खटाव तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारित झालेले आहे. या भागात वन्यजीव प्राणी मोठ्या संख्येने आहेत. रात्री, पहाटे आणि भर दिवसाही ते मनुष्य वस्तीत येत असून शेतकऱ्यांच्या पशुधनाचा खात्मा करत आहेत. त्यामुळे वस्तीवर राहणाऱ्या आणि पशुधनाची जोपासना करणाऱ्या शेतकरी आणि त्यांच्या महिलावर्गात कमालीची भीती पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी मांजरवाडी येथील महेंद्र पवार यांच्या खंडोबा मंदिराच्या समोर असलेल्या शेडमध्ये बांधलेल्या हजारो रुपये किमतीच्या जर्शी गायीचा पोटापासून पायापर्यंत वन्यप्राण्यांनी अक्षरश: फडशा पडला. 6 जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास गारवाडी येथील सूर्यकांत दादासो बिटले यांच्या 4 शेळ्या तर दुपारी त्याच गावातील युवराज निकम यांच्या 2 शेळ्या लांडग्याच्या गळाला लागल्याने मृत्यूमुखी पडल्या.
3 जुलै रोजी पहाटे अनपटवाडी येथील लक्ष्मण रामचंद्र निकम या शेतकऱ्याच्या 13 गाभण शेळ्या त्या रानटी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात यमसदनी गेल्या तर त्यांची लहान करड ही वाचली नाहीत. यादिवशी निकम कुटुंबीयांनी अन्नाचा घासही घेतला नाही. याच शेळ्यांच्या पालनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता.
4 जुलै रोजी भर दुपारी डिस्कळ जवळ असलेल्या पसूचा मळा येथील शशिकांत बबन कर्णे यांच्या दोन शेळ्यावर वन्यप्राण्यांनी हल्ला चढवला. मात्र त्यातील एक शेळी बळी गेली आणि एकीला डिस्कळ पशुवैद्यकीय सहायक पर्यवेक्षक आकाश भोसले व वन विभागाचे प्रशांत मदने यांनी तातडीने उपचार केल्याने जीवदान मिळाले आहे.
याबाबत पुसेगाव पशुवैद्यकीय अधिकारी हणमंत जाधव यांनी मृत शेळ्यांचा वैद्यकीय अहवाल सादर केला आहे. मृत शेळ्यांच्या मानेवर, गळ्याला आणि पायावर लचके तोडून रक्त पिल्याचे दिसून येत आहे. एखादा प्राणी बराच काळ मृत झाल्यास त्याचे पोट ही फुगते. डोंगराळ भागातील वन विभागात वास्तवास असलेल्या लांडग्यांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यामुळे सदर घटना झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. बाधितांना तातडीने भरघोस आर्थिक मदत मदत शासनाने द्यावी अशी मागणी केली जात आहे.