आटपाडीत जिल्हा परिषदेचे चार गट होणार
आटपाडी / सूरज मुल्ला :
आटपाडी, भिंगेवाडी व मापटेमळा या गावांचा नगरपंचायतमध्ये समावेश झाल्याने पुर्वीचा आटपाडी जिल्हा परिषद गट रद्द झाला आहे. आता या गटातील वंचित गावांसह अन्य गावांचा समावेश करून पुर्वीप्रमाणे चौथा जिल्हा परिषद गट अस्तित्त्वात येणार आहे. पुर्वीच्या आटपाडी गटातील ९ गावांसह फेररचनेत कोणत्या गावांचा समावेश नवीन गटात होणार ? याची राजकीय मंडळींना उत्सुकता लागली आहे.
आटपाडी तालुक्यात यापुर्वी दिघंची, आटपाडी, खरसुंडी व करगणी असे चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समितीचे गण होते. २०१७मध्ये त्यानुसारच निवडणुक प्रक्रिया पार पडली. परंतु तीन वर्षापुर्वी आटपाडी, भिंगेवाडी व मापटेमळा या गावांचा समावेश करून नगरपंचायत अस्तित्त्वात आली. परिणामी आटपाडी जिल्हा परिषद गटातुन एक पंचायत समिती गण कमी झाला. मोठी लोकसंख्या या जिल्हा परिषद गटातून नगरपंचायतमध्ये समाविष्ट झाली आणि तत्कालीन आटपाडी गटातील ९ गावे शिल्लक राहिली आहेत.
आत्ता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या असून प्रभाग रचना करण्याचे निर्देश देवून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. २०१७च्या स्थितीनुसारच लोकसंख्येचा विचार करून नवीन जिल्हा परिषद, पंचायत समिती गणाची फेररचना होणार आहे. आटपाडी जिल्हा परिषद गटातून तीन गावे बाजुला झाल्याने उर्वरीत नऊ गावांचा समावेश करून नवीन जिल्हा परिषद गट निर्मीती होणार आहे.
आटपाडी गटातुन सध्या बाजुला असलेल्या नऊ गावांसह अन्य गावांचा समावेश चौथ्या जिल्हा परिषद गटात होणार आहे. नवीन जिल्हा परिषद गट निर्माण होताना त्यामध्ये कोणकोणती गावे समाविष्ट होणार ? हे फेररचनेनंतरच स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीला आटपाडी गटातून वंचित राहिलेल्या नऊ गावातील जनतेची चौथा स्वतंत्र जिल्हा परिषद गट निर्माण करण्याची मागणी आहे. आटपाडीतुन बाजुला राहिलेल्या गावांना अन्य गटात समाविष्ट करण्याऐवजी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार चौथा जिल्हा परिषद गट निर्माण होणे सोयीचे ठरणार आहे.
रद्द झालेल्या आटपाडी जि.प. गटातील नगरपंचायत क्षेत्रातील गावे सोडुन उर्वरीत गावांचा नवीन गट कशा स्वरूपात असणार ? याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या फेररचनेकडे या गावांचे लक्ष लागले आहे.
जि.प.च्या निवडणुकांना तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. पंचायत समिती व जि.प.वर असणाऱ्या प्रशासक राजला जनता कंटाळली आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच मनमानी सुरू आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे सर्वांनाच निवडणुकीची प्रतिक्षा आहे. जि.प. पंचायत समित्यांसह नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आणि प्रत्यक्ष हालचाली गतीमान झाल्याने इच्छुकांनीही 'फिल्डींग' लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आटपाडी नगरपंचायत क्षेत्राच्या निर्मितीनंतर होत असलेल्या नवीन जिल्हा परिषद गटातील संभाव्य गावांतील लोकांमध्ये उत्सुकता आहे. आटपाडी नगरपंचायतमध्ये भिंगेवाडी, मापटेमळा व आटपाडी गावांचा समावेश झाला आहे. आत्ता आटपाडी जिल्हा परिषद गटातील माडगुळे, यपावाडी, खानजोडवाडी, बोंबेवाडी, आंबेवाडी, कौठुळी, पिंपरी खुर्द, देशमुखवाडी, पुजारवाडी (आ) ही ९ गावे नव्या फेररचनेमध्ये अन्य कोणत्या गावांसह नवीन जिल्हा परिषद गटातून वाटचाल करणार ? याकडे नजरा लागल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार फेररचनेमध्ये आटपाडी तालुक्यात चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या जागा कायम राहणार आहेत. नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यानंतर फेररचनेतुन चौथा गट अस्तित्त्वात येणार आहे. कमी झालेल्या आटपाडी जिल्हा परिषद गटानंतर कोणता जिल्हा परिषद गट आणि कोणते दोन पंचायत समिती गण निर्माण होतात? याची उत्सुकता शिगेला पोहचली असून राजकीय कार्यकर्त्यांची उत्सुकता लवकरच संपुष्टात येण्याची चर्चा आहे.