रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षे पूर्ण
अद्यापही अनिर्णित अवस्था, युक्रेनची दुरवस्था
वृत्तसंस्था / मॉस्को, कीव्ह
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला चार वर्षे पूर्ण झाली असून अद्यापही हे युद्ध अनिर्णित अवस्थेत आहे. 24 फेब्रुवारी 2022 या दिवशी या युद्धाचा प्रारंभ झाला. त्यानंतर ते गेली चार वर्षे अव्याहतपणे चाललेले आहे. या युद्धात आतापर्यंत रशिया आणि युक्रेनचे मिळून किमान अडीच लाख नागरीक मारले गेले असावेत, असे अनुमान आहे. या युद्धामुळे युक्रेन उध्वस्त झाला असून रशियाचीही मोठी हानी झाली आहे. तरीही हे युद्ध थांबण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.
काही दिवसांमध्येच संपूर्ण युक्रेनवर अधिपत्य प्रस्थापित करणे शक्य होईल, अशी रशियाची समजूत या युद्धाचा प्रारंभ झाला तेव्हा होती. तथापि, युरोपियन देश आणि अमेरिका यांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि पैशाचे पाठबळ पुरविल्याने हे युद्ध चार वर्षे लांबले असून संपूर्ण युक्रेनवर नियंत्रण मिळविणे रशियाला शक्य झालेले नाही. चार वर्षांच्या या कालावधीत युक्रेनच्या 20 टक्के भागावर रशियाने नियंत्रण मिळविले आहे. युक्रेनचा क्रिमिया हा भाग रशियाने 2014 मध्येच आपल्याकडे घेतला होता. आताही डोनबास या युक्रेनच्या भागाचे बव्हंशी नियंत्रण रशियाकडे आले आहे. तथापि, युक्रेन आजही प्रतिकार करत आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आलेले आहेत. विशेषत: अमेरिकेच्या पुढाकाराने शांतता चर्चा करण्यात आली आहे. तथापि, सामोपचाराच्या या प्रयत्नांना अत्यंत मर्यादित यश आल्याचे दिसून येते. युद्ध पूर्णपणे थांबविण्यात अद्याप रशिया, युरोप किंवा अमेरिका यांच्यापैकी कोणालाही यश आलेले नाही.
अमेरिकेचे मोठे साहाय्य
या युद्धात अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला मोठे साहाय्य केले आहे. जोसेफ बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात युक्रेनला अमेरिकेने 175 अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य (साधारणत: 16 लाख कोटी रुपये) केले आहे. यात युद्ध सामग्रीचाही समावेश आहे. मात्र, 2025 च्या जानेवारीत सत्तेवर आलेल्या ट्रंप प्रशासनाने हे साहाय्य थांबविलेले आहे. जून 2026 पर्यंत दोन्ही देशांनी वाटाघाटी करुन हे युद्ध थांबवावे, अशी सूचना अमेरिकेने केली आहे. पण त्यासंबंधी साशंकता आहे.
भारताची भूमिका
हे युद्ध थांबावे आणि दोन्ही देशांनी परस्परांशी चर्चा करुन सामोपचाराने मार्ग काढावा, ही भूमिका भारताने प्रथमपासूनच घेतली आहे. सध्याचे युग हे युद्धाचे नसून शांततेचे आहे, असा संदेश भारताने दोन्ही देशांपर्यंत वारंवार पोहचविला आहे. रशिया भारताचा जवळचा मित्र देश असतानाही भारताने रशियाची बाजू या युद्धात उघडपणे घेतलेली नाही. तसेच, युक्रेनचीही पाठराखण केलेली नाही.
युद्धाचे परिणाम व्यापक
या युद्धाचे रशिया आणि युक्रेनवर तर घातक परिणाम झालेलेच आहेत. तसेच युरोप, अमेरिका आणि संपूर्ण जगावर झालेले आहेत. युक्रेनकडून होणारी निर्यात थांबल्याने जगात काही वस्तूंच्या पुरवठा साखळ्या मोडल्या आहेत. रशियाच्या तेलविक्री कंपन्यांवरही आता अमेरिकेने निर्बंध घातल्याने रशियाच्या तेलविक्रीवर परिणाम होऊन त्या देशाची तेलविक्री कमी झाली आहे. भारतानेही आता रशियाकडून खरेदी करत असलेल्या तेलाचे प्रमाण कमी केले आहे. मात्र, चीन अद्याप रशियाकडून तेलाची खरेदी करीत आहे. युरोपवर या युद्धाचा अधिक गंभीर परिणाम झाला आहे. या खंडातील राजकीय समीकरणे उलटीपालटी झाली आहेत. अमेरिकेने युक्रेनचे अर्थसाहाय्य रोखल्यामुळे ते उत्तरादायित्व आता युरोपियन देशांवर येऊन पडले आहे. युरोपियन देशांनी त्यांचा संरक्षण खर्च वाढविला आहे.
मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
या युद्धामुळे युव्रेनमधील किमान 70 लाख नागरीकांनी पलायन केले आहे. त्यांनी शेजारच्या पोलंड आदी देशांमध्ये आश्रय घेतला असल्याने त्या देशांवरचा दबाव आणि खर्चही वाढला आहे. रशिया हा देश मोठा असल्याने त्याची हानी कमी प्रमाणात झाली असली, तरी आर्थिक हानीचे प्रमाण मोठे आहे. एकंदर, या युद्धामुळे जगाची घडी काही प्रमाणात विस्कटल्याचे दिसून येत असून हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, अशी विशेषत: युरोपातील देशांची इच्छा आहे. रशियासंबंधी हे देश साशंक आहेत. त्यामुळे ते युक्रेनला साहाय्य करीत आहेत.
युद्धाचे परिणाम घातक
ड युद्धामुळे युक्रेन उध्वस्त, 70 लाखांहून अधिक युव्रेन नागरीक स्थलांतरित
ड रशियाचीही मोठी हानी, किमान 1.20 लाख सैनिक नागरीक मुकले प्राणांस
ड काही वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत, काही वस्तूंची टंचाई
ड युरोपच्या राजकारणात व्यापक परिवर्तन, या देशांना स्वत:च्या सुरक्षेची चिंता