चार वर्षांचा वाद अन् थेट माजी सैनिकावर गोळीबार
कराड :
मुलीसह जेवायला बसलेल्या वडिलांवर रेकॉर्डवरील गुन्हेगाराने घरात घुसून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री कराडलगतच्या विद्यानगर येथील ओम कॉलनीत अक्षरा अपार्टमेंट येथे घडली होती. गोळीबारात माजी सैनिकासह त्याची सात वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाले. एकाच अपार्टमेंटमध्ये राहून गेल्या चार वर्षांपासून दोन कुटूंबात धुमसत असलेल्या वादाचे थेट गोळीबारात पर्यवसन झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित सुरेश अशोक काळे (रा. अक्षरा अपार्टमेंट, विद्यानगर, कराड) याला शनिवारी सकाळी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयितास 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, गोळीबारात जखमी झालेले माजी सैनिक प्रदिप शंकर घोलप (वय 38 मुळ रा. निगडी ता. कराड, सध्या रा. अक्षरा अपार्टमेंट फ्लॅट नं 305 विद्यानगर ता. कराड) यांच्यासह त्यांची मुलगी श्राव्या यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुचाकी पार्कींगचे निमित्त कारण खुन्नस
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदिप घोलप हे सैन्यदलात होते. ते सैन्यदलातून निवृत्त झाल्यावर कराडच्या विद्यानगर येथील अपार्टमेंटमध्येच 305 नंबरच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. त्याच अपार्टमेंटमध्ये खालच्या मजल्यावर 104 नंबरच्या फ्लॅटमध्ये संशयित सुरेश अशोक काळे हा कुटूंबासह रहात आहे. सैन्यदलातील निवृत्तीनंतर घोलप यांनी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी खासगी नोकरी स्वीकारली. दरम्यान, 4 वर्षांपुर्वी घोलप आणि काळे यांच्यात काही कारणाने खटका उडाला होता. त्यांच्यात भांडणही झाले होते. दोघांच्याही मनात यातून एकमेकांविषयी रोष वाढत गेला असावा असे पोलिसांनी सांगितले. चार वर्षात या दोघात सोसायटीच्या कामाच्या निमित्ताने होणाऱ्या अनेक नियोजनात वाद होत असत. घोलप यांना विरोध करण्यात संशयिताचा नेहमी प्रयत्न असायचा. मात्र पुन्हा भांडण नको म्हणून घोलप हे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पार्कींगवरून वाद नव्हे बोलणे अन् गोळीबार
27 डिसेंबर 2024 रोजी प्रदिप घोलप हे साताऱ्याला कामानिमित्त गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता ते अपार्टमेंट येथे परतले. पार्कींग झोनमध्ये गाडी नेत असतानाच संशयित सुरेश काळे याने त्याची दुचाकी रस्त्यातच लावली होती. काळे पार्कींगमध्येच थांबला होता. यावर घोलप यांनी त्याला तुमची दुचाकी बाजुला लावा. त्याचा तुम्हालाही त्रास होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही असे सांगितले. यानंतर घोलप हे त्यांची गाडी पार्कींगमध्ये लावून त्यांच्या फ्लॅटमध्ये गेले. ते घरात गेले असतानाच दुसरीकडे संशयिताच्या डोक्यात वेगळाच कट शिजत होता असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, तपास अधिकारी राजेश माळी यांनी सांगितले.
गोळीबार... एकदा आरपार तर दुसऱ्यांदा मुलीच्या हातात
संशयित काळे याच्या बोलून घोलप त्यांच्या फ्लॅटमध्ये गेले. नेहमीप्रमाणे त्यांच्या मुली त्यांच्यासमवेत बोलत बसल्या अन् काही वेळाने ते जेवायला बसले. मुलगी श्राव्या आणि श्रुतिका या सुद्धा वडिलांसमवेत जेवत होत्या. त्याचवेळी 7.45 वाजता संशयित घरी आला थोडा वेळ बोलून बाहेर गेला. पुन्हा आत आला आणि त्याने थेट त्याच्याकडील पिस्तुलने घोलप यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळी घोलप यांच्या गालातून आरपार गेली अन् श्राव्याच्या डाव्या हाताला घासून उजव्या हातात घुसली. डॉक्टरांनी अत्यंत जिकिरीने ही गोळी मुलीच्या हातातून बाहेर काढली असे फिर्यादीत म्हटले आहे.
एसपींची मध्यरात्री कराडकडे धाव
जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी मध्यरात्री कराडला येत घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. जखमींसह संशयिताकडे त्यांनी दीड तास चौकशी केली. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. संशयिताकडून एका गावठी पिस्तुलसह 17 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याने पिस्तुल कोणाकडून आणले याची चौकशी करत अन्य एका संशयिताला पोलीस उपअधिक्षक ठाकूर यांच्या पथकाने पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी अद्यापही सुरू आहे.
2010 साली झाली होती मोठी कारवाई
गोळीबाराच्या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळाची पुन्हा पाहणी केली. यानंतर सहाय्यक निरीक्षक राजेश माळी यांनी पंचनामा केला. संशयिताकडे चौकशी केल्यानंतर त्याला सन 2010 मध्ये बेकायदा पिस्टल बागळल्याप्रकरणी कराड पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले. पोलिसांनी सांगितले की, सन 2010 साली महाविद्यालयीन युवकांच्यात गुन्हेगारीसह पिस्तुलचे आकर्षण निर्माण झाले हेते. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना महाविद्यालय परिसरात पिस्तुल तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पाटील यांनी तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास धस, धनंजय पिंगळे यांना सापळा रचण्यास सांगितले. धस यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील नव्याने पोलीस दलात आलेल्या अमित पवार, युवराज पाटील, शशिकांत काळे, सज्जन जगताप यांना महाविद्यालयीन युवक बनवून तस्करांशी ओळख करून घेत त्यांच्या हालचाली टिपण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पोलिसांनी सलग महिनाभर संशयितांशी मैत्री करून त्यांच्याकडील सर्व माहिती घेत. अखेर छापा टाकून जिल्ह्यात पहिल्यांदाच पाच पिस्तुल हस्तगत केली होती असे पोलिसांनी सांगितले.