महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उसाची ट्रॉली उलटून चार महिला ठार

10:58 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथील दुर्घटना : मोलमजुरी करणाऱ्या महिलांवर काळाचा घाला

Advertisement

कागवाड : सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये कोणाचे मरण कोठे लिहिले आहे हे कळेनासे झाले आहे. हा एक नियतीचा खेळ म्हणावा लागेल. अशीच घटना शेडबाळ येथे घडली आहे. मजुरी करून घरी परतणाऱ्या चार महिलांच्या अंगावर ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या अपघातात तीन महिला जागीच ठार तर अन्य एक महिला उपचारासाठी नेताना गतप्राण झाली. या घटनेमुळे शेडबाळसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चंपाबाई व्यंकाप्पा तळकट्टी (वय 56), मालव्वा रावसाहेब ऐनापुरे (वय 45), भारती सत्यपाल घाटगे (वय 45), शेखाव्वा नरसप्पा नंदाळली (वय 48) अशी अपघातात मृत पावलेल्या दुर्दैवी महिलांची नावे आहेत. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, शेडबाळ येथील दलित कुटुंबातील महिला शेतात मोलमजुरीसाठी जात असतात. ज्वारी, हरभरा, गहू कापणीसह अन्य कामासाठी सदर महिला मजुरीसाठी जात होत्या. रविवारी पहाटेही मजुरीसाठी गेलेल्या महिला दुपारी 12 च्या सुमारास घरी परतत होत्या. दरम्यान, येथील रस्त्याच्या कडेने घरी परतत असताना काळ बनून आलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांचे होत्याचे नव्हते केले. यावेळी कारखान्याकडे गाळपासाठी जाणारी उसाची ट्रॉली अचानक उलटल्याने सदर ट्रॉलीखाली चंपाबाई, मालव्वा, भारती व शेखाव्वा या सापडल्या. यात तिघींचा जागीच मृत्यू झाला. तर शेखाव्वा हिला उपचारासाठी नेताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी होताना वाहतूक कोंडी झाली होती.

Advertisement

मालव्वा रावसाहेब ऐनापुरे या नगरपंचायतीचे सदस्य बाबू ऐनापुरे यांच्या आई होत्या. भारती सत्यपाल घाटगे या आपल्या पतीचे घर सोडून शेडबाळ येथे आपल्या भावाच्या घरी राहून मोलमजुरी करीत होत्या. चंपाबाई तळकट्टी या महिलेला दोन विवाहित मुले आहेत. ती इंदिरानगर येथील असून अचानक नियतीने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचेही मन हेलावून गेल्याचे पहावयास मिळाले. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी घटनेची माहिती समजताच तातडीने धाव घेऊन बचाव कार्यासाठी प्रयत्न केले. तर माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील हे अथणी येथील एका खासगी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते. अपघाताची माहिती समजतात कार्यक्रम अर्धवट सोडून त्यांनी अपघातस्थळी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून मिळणारी मदत आमदार राजू कागे यांच्या प्रयत्नातून मिळवून देण्याचे आश्वासन दिले. घटनास्थळी अथणीचे सीपीआय रवींद्र नाईकवाडी, कागवाडचे पीएसआय एम. बी. बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर ट्रॅक्टर हा हुलगबळी येथील असून ट्रॅक्टर-ट्रॉलीचा एक्सल तुटल्याने ट्रॉली उलटल्याचे समजते. पोलीस अधिक तपास करीत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अपघातातील दगावलेल्यांना 2 लाख भरपाई

बेळगाव : शेडबाळ, ता. कागवाडजवळ ऊसवाहू ट्रॅक्टर अपघातात दगावलेल्या चौघा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे. साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी रविवारी रात्री ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निदर्शनास हे प्रकरण आणून देण्यात आले आहे. एक विशेष प्रकरण म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई देण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे, असेही साखरमंत्र्यांनी सांगितले. या अपघाताबद्दल शिवानंद पाटील यांनी दु:ख व्यक्त केले असून भरपाईसंदर्भात साखर कारखान्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article