विंडीज संघातून चार जणांना डच्चू
वृत्तसंस्था / सेंट जोन्स
लंकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा करण्यात आली असून चार वरिष्ठ अनुभवी खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. या मालिकेसाठी आंद्रे रसेल, निकोलास पुरन, अकिल हुसेन आणि सिमरन हेटमायर यांना संघात स्थान मिळू शकले नाही. काही वैयक्तिक समस्यांमुळे हे चार अनुभवी खेळाडू या मालिकेसाठी उपलब्ध राहणार नसल्याचे विंडीज क्रिकेट मंडळाकडून सांगण्यात आले आहे. विंडीज संघाचे प्रमुख प्रशिक्षक डरेन सॅमी यांच्या सुचनेनंतरच निवड समितीने या मालिकेसाठी इव्हीन लेवीस व ब्रेन्डॉन किंग यांना संघात संधी दिली आहे. त्याचप्रमाणे टेरेन्सी हिंडस् व शमार स्प्रिंगेर हे नवे चेहरे आहेत. रोवमन पॉवेलकडे कर्णधारपद सोपविण्यात आले असून रॉयस्टन चेस उपकर्णधार म्हणून राहिल. विंडीज आणि लंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 तसेच त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका 10 ते 27 ऑक्टोबर दरम्यान खेळविली जाणार आहे. विंडीजच्या वनडे संघाचे नेतृत्व शाय हॉपकडे तर उपकर्णधारपद अलझारी जोसेफकडे सोपविण्यात आले आहे.
विंडीज टी-20 संघ: आर. पॉवेल (कर्णधार), रॉयस्टन चेस (उपकर्णधार), अॅलेन, अथांजे, फ्लेचर, हिंडस्, शाय हॉप, अलझारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रेंन्डॉन किंग, लेव्हीस, गुदाकेश, मोती, रुदरफोर्ड, शेफर्ड आणि स्प्रिंगेर.
विंडीज वनडे संघ: शाय हॉप (कर्णधार), अलझारी जोसेफ (उपकर्णधार), अॅन्ड्रीव्ह, अथांजे, कार्टी, रॉयस्टन चेस, मॅथ्यु फोर्ड, शमार जोसेफ, किंग, लेव्हीस, मोती, रुदरफोर्ड, सिलेस, शेफर्ड, हेडन वॉल्श ज्युनिअर.