हिंडलगा येथील दुभाजकावर दोन दिवस चारचाकी गाड्यांचे अपघात
दोन्ही बाजूला सूचनाफलक-रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी
वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव-वेंगुर्ला रोडवर हिंडलगा या ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढवून दुभाजक घातला आहे.या दुभाजकाच्या दोन्ही टोकांना सूचनाफलक तसेच रिफ्लेक्टर नसल्याने वरचेवर या ठिकाणी अपघात होत आहेत. गेले दोन दिवस येथे अपघाताची मालिका चालूच आहे. सुदैवाने या दोन्ही अपघातात जीवितहानी टळली. परंतु गाड्यांचे नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे. गुरुवार दि. 4 व शुक्रवार दि. 5 रोजी संध्याकाळी हे दोन्ही अपघात झाले आहेत.
गणेशोत्सव पाहण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर असल्याने वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. तसेच या दुभाजकांच्या दोन्ही टोकांना दोन मद्यपानाची दुकाने असल्याने या ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असते. यामुळे या गर्दीतून या दुभाजकाचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. त्यामुळेच या दोन्ही बाजूच्या दुभाजकावर रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत. दुभाजकाच्या दोन्ही टोकांना बांधकाम खात्याने लागलीच दखल घेऊन सूचनाफलक तसेच लाल रंगाचे रिफ्लेक्टर बसवावेत अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.
दोन दिवस झालेल्या अपघातात दोन्ही चार चाकी सुमो गाड्या होत्या.अपघात होताच ग्रामपंचायत उपाध्यक्षा चेतना अगसगेकर व सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर यांनी दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शशिकांत कोळेकर यांच्याशी संपर्क साधून सूचनाफलक लावण्याबाबत चर्चा केली असता शनिवार दि. 6 रोजी सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीचे आश्वासन दिले. दोन्ही अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.