काकतीच्या चोरट्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त
एपीएमसी पोलिसांची कारवाई
बेळगाव : एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून 1 लाख 12 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मोहम्मदशाईद अब्दुलहमीद मुल्ला (वय 28) रा. आंबेडकर गल्ली, काकती असे त्याचे नाव आहे. तो व्यवसायाने मेकॅनिक आहे. एपीएमसी पोलीस स्थानकातील काळ्या यादीत त्याचा समावेश आहे. त्याला अटक करून त्याच्याजवळून दोन हिरोहोंडा स्प्लेंडर, एक होंडा अॅक्टिव्हा, एक बजाज डिस्कव्हर अशा चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक यु. एस. आवटी, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, उपनिरीक्षक एस. आर. मुत्तती, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, बसवराज नरगुंद, खादरसाब खानमन्नावर, गोविंदप्पा पुजार व तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव खशीद आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली. नेहरूनगर येथील केएलई इस्पितळासमोर व शहरातील विविध भागात उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली आहे.