सिक्कीममध्ये जेसीओसह चार जवानांना हौतात्म्य
लष्करी वाहन दरीत कोसळल्याने दुर्घटना
वृत्तसंस्था/गंगटोक
सिक्कीममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे गुऊवारी लष्कराचे एक वाहन दरीत कोसळल्याने भारतीय लष्कराचे चार जवान हुतात्मा झाले. मृतांमध्ये लष्करी जेसीओंचाही समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सिक्कीमच्या पाकयोंग जिह्यात हा अपघात झाला. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुऊवारी भारतीय लष्कराचे चार सैनिक पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाकयोंग जिह्यातून जुलुककडे निघाले होते. त्याचवेळी रँक रोंगली राज्य महामार्गावरील दलोपचंद दाराजवळ लष्कराचे एक वाहन सुमारे 700 ते 800 फूट दरीत कोसळले. या अपघातात जेसीओसह चार जवानांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मध्य प्रदेशातील चालक प्रदीप पटेल, मणिपूर येथील शिल्पकार डब्ल्यू पीटर, हरियाणातील नाईक गुरसेव सिंग आणि तामिळनाडू येथील सुभेदार के थंगापांडी यांचा समावेश आहे. चालकासह सर्व मृत लष्करी कर्मचारी पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील युनिटमध्ये तैनात होते.