वास्कोत चार दुकानांना आग
सुमारे वीस लाखांचे नुकसान : अन्य दुकाने वाचविण्यात यश
प्रतिनिधी/ वास्को
वास्को शहरातील संडे मार्केटमध्ये चार दुकानांना आग लागून दुकानांसह साहित्याचीही हानी झाली. या घटनेत सुमारे 20 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे 3 वा.च्या सुमारास ही घटना घडली.
वास्कोतील संडे मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्केटमध्ये दाटीवाटीने दुकाने थाटलेली आहेत. तसेच ही दुकाने असुरक्षित आहेत. अशाच दुकानांपैकी एकाच रांगेतील चार दुकानांना आग लागली. चारपैकी दोन दुकाने पूर्णपणे जळाली तर अन्य दोन दुकाने अर्धवट जळाली. दुकानांसह आतील विक्रीसाठी ठेवलेला मालसुद्धा जळून खाक झाला. त्यामुळे जवळपास 20 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे त्या दुकानांच्या रांगेतील इतर दुकाने नुकसानीपासून वाचली.
सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची शक्यता आहे. पहाटेची वेळ असल्याने आग पूर्णपणे भडकल्यानंतरच घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पहाटे 4 वा. च्या सुमारास स्थानिक आमदार दाजी साळकर घटनास्थळी दाखल झाले. आमदार दाजी साळकर यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना त्वरित आर्थिक मदतही केली. नगराध्यक्ष गिरीश बोरकर तसेच स्थानिक नगरसेविका शमी साळकर यांनीही झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आमदारांनी सदर दुकानदारांना सरकारतर्फे मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच दुकानदारांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी अशीही सूचना केली.