For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार सत्रातली घसरण थांबली, शेअरबाजार तेजीसह बंद

06:27 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार सत्रातली घसरण थांबली  शेअरबाजार तेजीसह बंद
Advertisement

सेन्सेक्समध्ये 375 अंकांची तेजी : एफएमसीजी, बँकिंक समभाग तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सलग चार सत्रांमध्ये सुरु असलेल्या घसरणीला अखेर सोमवारी आठवड्यात पहिल्या दिवशी ब्रेक लागला. सेन्सेक्स 375 अंकांच्या वाढीसह बंद झाला असून एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांनी शेअरबाजाराला आधार दिला.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 375 अकांच्या वाढीसोबत 81559 अंकांवर तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 84 अंकांच्या वाढीसोबत 24936 अंकांवर बंद झाला. सकाळी निफ्टी 29 अंकांनी घसरत 24823 अंकांवर तर सेन्सेक्स 210 अंकांनी घसरत 80974 अंकांवर खुला झाला होता. दिवसभरात बाजारात चढ उतार होता. शेवटच्या सत्रात बाजाराने तेजीची दिशा पकडली. एफएमसीजी आणि निफ्टी बँक निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. यांनी बाजाराला आधार देण्याचे काम केले. सोमवारी हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग सर्वाधिक तेजीसह म्हणजेच 2.92 टक्के वाढत 2922 रुपयांवर बंद झाले होते. आयसीआयसीआय बँकेचे समभागही 2.23 टक्के वाढत 1235 रुपयांवर बंद झाले. यांच्यासोबत आयटीसी 2 टक्के वाढत 511 रुपयांवर, कोटक बँक 1.48 टक्के वाढत 1790 रुपयांवर आणि इंडसइंड बँकेचे समभाग 1.34 टक्के वाढीसह 1428 रुपयांवर बंद झाले.

आयटी कंपन्यांचे समभाग घसरणीत

शेअरबाजारात सोमवारच्या व्यवहारात सर्वाधिक घसरण ही आयटी क्षेत्रात दिसली. टेक महिंद्राचे समभाग 2.72 टक्के घसरत 1579 रुपयांवर बंद झाले.  निफ्टी आयटी निर्देशांक 0.73 टक्के घसरणीसोबत 41,919 स्तरावर बंद झाला. यानंतर एनटीपीसी 1.26 टक्के घसरत 389 रुपयांवर, टाटा स्टीलचे समभाग 1.16 टक्के घसरत 149 रुपयांवर बंद झाले. ऑटो क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स, एचसीएल टेक यांचे समभागही घसरणीत होते. शेअरबाजाराला खरा आधार दिला तो एफएमसीजी क्षेत्राने. निफ्टी एफएमसीजी 2.04 टक्के वाढत 64,466 अंकांवर बंद झाला व बँक निफ्टी 1.07 टक्के वाढत 51,118 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ऊर्जा निर्देशांक 0.68 टक्के घसरत 41,927 वर बंद झाला. यासोबत निफ्टी ऑटो निर्देशांकही 0.12 टक्के घसरुन 25,495 च्या स्तरावर बंद झाला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी जागतिक बाजारातील दबावामुळे भारतीय शेअर बाजार काहीसा घसरणीसह सुरू झाला. अमेरिकेमध्ये रोजगाराचे प्रमाण कमी झाल्याने शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी आशिया बाजारातही दबावामध्ये कामकाज सुरू होते. अमेरिकेत शुक्रवारी बाजारातील घसरणीनंतर सोमवारी भारतीय शेअरबाजारात आयटी समभाग काहीसे दबावात कार्यरत होते. याच दरम्यान मॉर्गन स्टॅनले यांनी अलीकडच्याच एका अहवालामध्ये आयटी समभागांमध्ये तेजी सुरूच राहणार असल्याचे म्हटले होते.

Advertisement
Tags :

.