चौकुळ येथे शिकारीसाठी गेलेले चारजण ताब्यात
बचावासाठी शिकाऱ्यांनी केली वन कर्मचाऱ्यांवर फायरिंग
वार्ताहर/ आंबोली
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली - चौकुळ केगदवाडी येथील इसापूर तेरवाण रस्त्यावर शिवकालीन तळीशेजारी गस्त घालणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास शिकार करणाऱ्या ४ जणांना ताब्यात घेतले .यावेळी त्यांच्याकडून ५ जिवंत काडतुसे, मृत ससा, दोन मोबाईल, तीन मोटर सायकल आणि दोन बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. यावेळी जंगलात शिकारीसाठी गेलेले शिकारी प्रशांत सदानंद कुबल रा -कुडाळ, अमोल नामदेव गावडे रा. चौकुळ, दशरथ बाबुराव राऊळ रा. माडखोल, सखाराम रामचंद्र राऊळ रा. माडखोल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.यावेळी शिकाऱ्यांनी बचावासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर फायरिंग केले . परंतु सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही कार्यवाही आंबोली वनविभागाच्या वनक्षेत्रपाल सौ. प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .परंतु यावेळी त्यांनी बंदुका लपविल्यामुळे बंदुक हस्तगत करण्यात आली नाही.
मिळालेल्या माहीती नुसार आंबोली चौकुळ परिसरात सध्या हत्ती फिरत असल्याने या परिसरात वनविभागाची एक टीम दररोज रात्री गस्त घालीत असते. ठरल्या प्रमाणे मंगळवारी रात्री आंबोली वनक्षेत्रपाल सौ. प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवसू वनपाल एम. ए. नाईकवडे, संकल्प जाधव ,वनरक्षक मासुरे, आदित्य लाड , मंगेश सावंत, एकनाथ पारधी, जलद कृती दलाचे प्रथमेश गावडे, राकेश अस्मृसकर असे सर्वजण वन विभागाच्या वाहनाने प्रथम आंबोली नांगरतास गडदूवाडी येथे हत्ती भ्रमण क्षेत्रात जाऊन गस्त घालून आले. आणि त्यानंतर चौकुळ येथे त्यांनी या चार शिकाऱ्याना ताब्यात घेतले