For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंदिरात चोरी करणाऱ्या चार जणांना अटक

02:57 PM May 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मंदिरात चोरी करणाऱ्या चार जणांना अटक
Advertisement

७ लाखाचा मुद्देमाल जप्त ; सावंतवाडी येथील हॉटेलात आरोपी वास्तव्यास

Advertisement

रायगड । प्रतिनिधी

मंदिरात चोरी करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे .  रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील बहिर्देव मंदिर, हनुमान मंदिरा मध्ये चोरी झाली होती. या चोरीचा तपास करीत असताना खोपोली पोलिसांनी  वरील चोरी प्रकरणी सर्व आरोपींना सावंतवाडी येथून अटक करण्यात आले आहे . आरोपींची कसून चौकशी केली असता गोवा, पुणे, टिटवाळा येथील मंदिरामध्ये या टोळीने चोरी केल्याची कबुली  दिली असून सर्व आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

Advertisement

रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २५ एप्रिल रोजी बहिर्देव मंदिर येथे तर २६ एप्रिल रोजी शिळफाटा येथील हनुमान मंदिराचे दरवाजे तोडून दान पेट्या फोडण्यात आल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी बहिरदेव मंदिरातील दानपेटीतून १० हजार तर हनुमान मंदिर दानपेटीतील ८ हजार रुपये लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व त्यांचे सहकारी  करीत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरात गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली होती.  पोलिसांनी त्वरित हालचाल करून सावंतवाडी येथून वरील प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे.

राजू फरत शेख (२७) बांगलादेश, इम्रान शहीद शेख (२४) सुरत, राकिव कुल मोहम्मद शेख (२८) सुरत, आणि मुजाहिद गुलजार खान (२८) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी सावंतवाडीतील एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजल्या नंतर तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख २ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

चोरट्यांनी कोकणसह पुणे, गोव्यातील मंदिरातून चोरी केल्याचे चौकशीत उघड झाले , पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जैन मंदिर ,टिटवाळा येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ,म्हापसा गोवा येथील बोडगेश्वर मंदिर अशा विविध मंदिरातील दान पेट्या फोडून लाखो रुपयाचा ऐवज चोरून नेला असल्याची कबुली त्यांनी दिली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व त्यांचे सर्व सहकारी यांनी केली.

Advertisement
Tags :

.