For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार अपघातात मंत्री हेब्बाळकरांसह चौघे जखमी

10:11 AM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
कार अपघातात मंत्री हेब्बाळकरांसह चौघे जखमी
Advertisement

कित्तूरनजीक भरधाव कारची झाडाला धडक : जखमीत आमदार हट्टीहोळी यांचाही समावेश

Advertisement

बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या कारसमोर अचानक आडव्या आलेल्या प्राण्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कारची सेवा रस्त्यावरील झाडाला धडक बसली. मंगळवार सकाळी 6 च्या दरम्यान कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसनजीक हा अपघात घडला. यामध्ये मंत्री  लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य हट्टीहोळी यांच्यासह सुरक्षा रक्षक आणि चालक असे एकूण चौघेजण जखमी झाले. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी जाऊ देण्यात आले, तर मंत्री हेब्बाळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी बेंगळूरला गेले होते. बेंगळूर येथे सीएलपी बैठक आटोपून ते पुन्हा मंगळवारी सकाळी विमानाने बेळगावला येणार होते. मात्र, मतदारसंघातील काही कामानिमित्त ते मध्यरात्रीच कारमधून बेळगावला येण्यासाठी सरकारी वाहनातून निघाले होते. जी. शिवप्रसाद हा कार चालवत असताना कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसनजीक आल्यानंतर अचानक प्राणी समोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.तितक्यात समोरील कँटरला कारची धडक बसणार हे लक्षात येताच चालकाने कार सेवा रस्त्याकडे वळविली. त्यावेळी कारची सेवा रस्त्यावरील झाडाला जोराची धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील बोनेटच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

Advertisement

एअर बॅग ओपन झाल्याने मोठी दुर्घटना टळली

अपघातानंतर कारमधील एअर बॅग ओपन झाल्याने सुदैवानेच मोठी दुर्घटना टळली. यामध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीच्या कण्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली. तर विधान परिषद सदस्यांच्या कानाला आणि मानेला दुखापत झाली. तर चालक आणि सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाले. झाडाला धडक बसून मंत्री हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे समजताच कित्तूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांचे एमआरआय आणि सिटीस्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना उपचाराची गरज असल्याने काही दिवस उपचार केल्यानंतर घरी जाऊ दिले जाईल, असे सांगितले. हट्टीहोळी यांचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने घरी जाऊ देण्यात आले. त्याचबरोबर चालक आणि सुरक्षा रक्षकालाही उपचार करून सोडण्यात आले.

अपघाताची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी खासगी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. अपघाताची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्री हेब्बाळकर यांच्या नातेवाईक आणि समर्थकांनी रुग्णालय आवारात गर्दी केली होती. त्यावेळी त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांनी आपल्या आईची प्रकृती चांगली असून जनतेच्या आशीर्वादानेच या मोठ्या अपघातातून बचावल्या आहेत, असे सांगितले. त्यानंतर त्यांचे पती रवींद्र हेब्बाळकर यांनीही रुग्णालयाला भेट देऊन पत्नी हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी, माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार फिरोज सेठ, अनिल बेनके यांनी रुग्णालयाला भेट देऊन हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बसवराज होरट्टी आदींनीही फोनद्वारे अपघाताची माहिती घेऊन मंत्री हेब्बाळकर यांची विचारपूस केली. या अपघातप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा ठपका ठेवत सरकारी वाहनचालक जी. शिवप्रसाद याच्या विरोधात कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement
Tags :

.