न्याययंत्रणेतील व्यक्तीसह चौघांवर लाच मागितल्याचा गुन्हा
सातारा :
सातारा जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या जामीन अर्जासाठी मदत करुन जामीन करुन देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी न्याय यंत्रणेतील व्यक्तीसह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांच्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सातारा शहर पोलीस आणि लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला असता तो होवू न शकल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संयुक्ता राजेंद्र होळकर (वय 24, रा. खडकी) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र होळकर यांच्यावर दाखल असलेल्या गुह्यात त्यांना जामीन मिळावा यासाठी न्याय यंत्रणेकडे अर्ज केला होता. त्या कामी मदत करतो अशी बतावणी करत आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. बी.डी.डी.चाळ वरळी) यांनी विश्वास संपादन केला तर न्याय यंत्रणेतील व्यक्तीशी आमची ओळख आहे त्यांच्याशी त्या दौघांनी विलासपूर गोडोली परिसरातील एका हॉटेलमध्ये दि. 3 डिसेंबर रोजी भेट घडवून आणली. त्यावेळी त्यांना होळकर यांच्या जामीनाच्या अर्जासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी संबंधित व्यक्तीनी 5 लाख रुपयांचा आकडा सांगत तुम्हाला काय द्यायचे ते खुशीने द्या असे म्हणताच चर्चा झाली. त्यानंतर संयुक्ता होळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पैसे घेण्याचे ठिकाणही तेच हॉटेल ठरले. त्यानुसार दि. 9 रोजी बैठक झाली. त्यानंतर पुन्हा दि. 10 रोजी त्याच हॉटेलमध्ये लाच लुचपत विभागाने सापळा लावला होता. न्याय यंत्रणेतील व्यक्ती हे स्वत: गाडी घेवून पैसे घेण्यासाठी आले होते. त्यांनी पैसे घेण्यासाठी खरात यांच्यासह असलेल्या आणखी दोघांना कोडवर्डमध्ये खुणावले. पैसे स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुह्यातील संशयित आरोपी असलेल्या चौघांना ताब्यात घेतले आहे की आणखी पुढे काय याची माहिती घेण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे या प्रकरणातील अधिक माहिती मिळू शकली नाही.
न्याय यंत्रणेतील व्यक्तीवर गुन्हा दाखल पक्षकार करते म्हणजेच पाठबळ कोणाचे तरी?
इथे साधी मोबाईल हरवल्याची तक्रार द्यायला पोलिसात गेले तरीही पोलीस ठाण्यातले कर्मचारी चार दिवस हेलपाटे मारायला लावतात. हेलपाटे मारुनही पोलीस कर्मचारी तक्रारदाराशी नीटसे बोलत नाहीत. त्याच्याशी हिडीस फिडीस करतात. पोलिसांना एवढेच काम आहे काय?, असे काहीबाही सांगत असतात. असे असताना इथे तर न्याय यंत्रणेतील व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे पक्षकारांच्या पाठीमागे कोणीतरी बडी आसामी असल्याशिवाय हा गुन्हा दाखल होवू शकत नाही, अशीही चर्चा सध्या सुरु आहे.