उपोषणकर्त्यांपैकी चार डॉक्टर इस्पितळात
मागण्यांसाठी दहा दिवसांपासून आंदोलन
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ 5 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसलेल्या आणखी एका डॉक्टरची प्रकृती रविवारी रात्री खालावली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर पुलस्थ आचार्य यांना गंभीर अवस्थेत एनआरएस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोटात तीव्र वेदना होत असल्याची त्यांची तक्रार होती. त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात स्वतंत्र वैद्यकीय व्यवस्था तयार करण्यात आली आहे. उपोषणाला बसलेल्या 10 डॉक्टरांपैकी आतापर्यंत 4 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुलस्थ यांच्यापूर्वी 12 ऑक्टोबरला डॉ. अनुस्तुप मुखर्जी आणि डॉ. आलोक वर्मा यांची प्रकृती बिघडली होती. तर 10 ऑक्टोबर रोजी डॉ. अनिकेत महतो यांना आरजी रुग्णालयाच्या सीसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. बंगालचे मुख्य सचिव मनोज पंत यांनी सोमवारी कनिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला भेटायला बोलावले होते. मात्र, डॉक्टरांनी सरकारच्या आवाहनाकडे पाठ फिरवली होती. दुसरीकडे फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (एफएआयएमए) उपोषणाची हाक देत ज्युनियर डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.