या आठवड्यात 4 आयपीओ होणार सादर
एसआरआयटी इंडियासह इतरांचा समावेश : 500 कोटी रुपयांची होणार उभारणी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सोमवारपासून सुरु झालेल्या आठवड्यात शेअरबाजारात एकंदर 4 आयपीओ मेन बोर्डवर खुले होणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांची उभारणी होणार असल्याचे समजते. या आयपीओंमध्ये एसआरआयटी इंडिया, विशाल निर्मिती, नित्यास जेम्स अँड ज्वेलरी व शाह इन्वेस्टर्स यांचा समावेश असणार आहे.
या चार कंपन्यांच्या आयपीओपैकी बेंगळूरची आयटी कंपनी एसआरआयटी इंडिया आयपीओतून सर्वाधिक 218 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 14,195 ते 15000 रुपये इतकी रक्कम लागणार आहे.
पाहुया विविध कंपन्यांच्या आयपीओंची माहिती...
एसआरआयटी इंडिया: कंपनी आयपीओतून सुमारे 218 कोटी रुपये उभारणार आहे. हा आयपीओ सोमवारी 28 सप्टेंबरला खुला झाला असून 30 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. कंपनी आयपीओतून 1.68 कोटी नवे समभाग सादर करणार आहे. कंपनीने यासाठी 123 ते 130 रुपये प्रति समभाग अशी इशु किंमत निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी 115 समभागांच्या एका लॉटकरीता बोली लावावी लागणार आहे. ही कंपनी डिजिटल सोल्युशन, कस्टम अॅप्लीकेशन डेव्हलपमेंट व सिस्टम इंटीग्रेशन सर्व्हिसेस या सेवा देते. मुख्य स्वरुपात पाहता कंपनी हेल्थकेअर, इ-गव्हर्नन्स आणि टेलिकम्युनिकेशन्स सारख्या क्षेत्रात काम करते.
विशाल निर्मिती : सदरची कंपनी आपल्या आयपीओतून सुमारे 178 कोटी रुपये उभारणार आहे. सदरचा आयपीओ बुधवार 30 सप्टेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार असून 5 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होणार आहे. 208 ते 220 रुपये प्रति समभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 68 समभागांचा समावेश असून याकरीता बोली लावायची असल्यास गुंतवणूकदारांना 14,960 रुपये भरावे लागणार आहेत. समभाग 8 ऑक्टोबर रोजी शेअरबाजारात लिस्ट होणार आहेत. कंपनी रेल्वेसाठी प्री स्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपर्स, प्री कास्ट काँक्रीट प्रोडक्टस व पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी एमएम्स पाइप्सची निर्मिती करते. रेल्वे इन्फ्रा, सिंचन व सिव्हील प्रकल्पांत इपीसी सर्व्हिसही देते.
नित्यास जेम्स अँड ज्वेलरी : सदरची कंपनी आयपीओतून सुमारे 108 कोटी रुपये उभारणार आहे. सदरचा कंपनीचा आयपीओ 30 सप्टेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार असून 5 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होणार आहे. कंपनी आयपीओकरीता समभागाची किमत 70 ते 75 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये 200 समभागांचा समावेश असून गुंतवणूक करायची झाल्यास 15000 रुपये इतकी रक्कम लागणार आहे. कंपनीचे समभाग शेअरबाजारात 8 ऑक्टोबरला सुचीबद्ध होतील.
शाह इन्वेस्टर्स होम: सदरच्या कंपनीचा आयपीओ 28 सप्टेंबरला खुला झाला असून 30 सप्टेंबर पर्यंत या गुंतवणूक करता येणार आहे. कंपनी आयपीओतून सुमारे 90.17 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने आयपीओची इशु किमत 159 ते 167 रुपये प्रति समभाग निश्चित केली आहे. शेअर ब्रोकिंग क्षेत्रात ही कंपनी गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. लॉटमध्ये 85 समभागांचा समावेश असणार असून रिटेल गुंतवणूकदारांना बोली लावायची झाल्यास 14,195 रुपये इतकी रक्कम लागणार आहे. इक्विटी व डेरिवहेटीव्हज ब्रोकरेज, आयपीओ सर्व्हिसेस, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन व मार्जिन फंडिंगसारख्या सेवाही कंपनी देते.