सौदी अरेबियात भीषण दुर्घटनेत चार भारतीयांचा मृत्यू
केरळमधील परिवारावर ओढवले संकट
वृत्तसंस्था/ मलप्पुरम
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजरी येथील एका परिवाराच्या चार सदस्यांचा सौदी अरेबियातील एका रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अब्दुल अजीज (52 वर्षे), त्यांची आई मैमुनाथ कक्केनगल (73 वर्षे), त्यांच्या पत्नी थस्ना थोडेंगल (40 वर्षे) आणि त्यांचे पुत्र आदिल जलील (14 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
संबंधित परिवार मक्का येथून जेद्दा येथे जात असताना ही दुर्घटना घडली आहे. मदीनानजीक महामार्गावर त्यांची कार एका ट्रकला धडकली. या दुर्घटनेत अब्दुल जलील यांच्या मुली आयशा, हादिया आणि नूरा देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर तेथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. अब्दुल जलील हे जेद्दा येथे काम करत होते आणि अनेक वर्षांपासून सौदी अरेबियातच राहत होते. दुर्घटनेचे वृत्त कळताच मंजरी आणि आसपासच्या भागांमध्ये शोककळा पसरली आहे. कायदेशीर औपचारिका आणि मृतदेह भारतात आणण्यासाठी आता सौदी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला जात आहे. सौदी अरेबियातील केरळच्या लोकांची संघटना आणि कम्युनिटी ग्रूपही या संकटसमयी दु:खी परिवाराच्या मदतीसाठी सरसावले आहेत.