यू-19 सर्वोत्तम वर्ल्ड कप महिला संघात भारताच्या चौघींना स्थान
वृत्तसंस्था/ कौलालंपूर, मलेशिया
नुकत्याच झालेल्या यू-19 महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. आयसीसीने स्पर्धेचा सर्वोत्तम संघ निवडला असून त्यात भारतीय मुलींनीच वर्चस्व राखले आहे. भारताच्या एकूण चार खेळाडूंना या संघात स्थान मिळाले असून त्यात धडाकेबाज फलंदाज जी. त्रिशाचा समावेश आहे.
भारतीय युवा महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करून जेतेपद स्वत:कडेच राखले. यापूर्वी 2023 मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली जी. त्रिशा, तिची सलामीची साथीदार जी. कमलिनी व डावखुऱ्या फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मा व आयुषी शुक्ला यांनी या संघात स्थान मिळविले असल्याचे आयसीसीने निवेदनात म्हटले आहे. त्रिशाने या स्पर्धेत एका शतकासह सर्वाधिक 309 धावा जमविल्या. या स्पर्धेतील हे पहिलेच शतक आहे. तिने 147 च्या स्ट्राईकरेटने व 77.25 धावांच्या सरासरीने धावा जमविल्या. याशिवाय तिने गोलंदाजीत आपल्या लेगस्पिनवर 7 बळीही मिळविले.
कमलिनीने त्रिशा उत्तम साथ देत 143 धावा जमविल्या. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने 50 चेंडूत नाबाद 56 धावा जमवित निर्णायक खेळी केली होती. आयुषीने स्पर्धेत 14 बळी मिळविले. अंतिम फेरीत तिने द.आफ्रिकेचे 9 धावांत 2 बळी टिपले तर वैष्णवीने 17 बळी मिळविले. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात तिने हॅट्ट्रिकसह 5 धावांत 5 बळी मिळवित शानदार प्रदर्शन केले.
दक्षिण आफ्रिकेची जेम्मा बोथा, इंग्लंडची देव्हिना पेरिन, ऑस्ट्रेलियाची काओम्हे ब्रे या चौघींनीही या स्पर्धेत शंभरहून अधिक धावा जमविल्याने त्यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. लंकेची चमोदी प्रबोदा, नेपाळची पूजा महातो, इंग्लंडची केटी जोन्स हे या संघातील इतर खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या कायला रेनेकाला या संघाची कर्णधार करण्यात आले आहे. स्पर्धेत 6 बळी मिळविणारी द.आफ्रिकेची वेगवान गोलंदाज एन्थाबिसेंग निनी हिची 12 वी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
आयसीसीने निवडलेला सर्वोत्तम टी-20 विश्वचषक महिला संघ : कायला रेनेका (कर्णधार), जी. कमलिनी, जी. त्रिशा, जेम्मा बोथा, देव्हिना पेरिन, काओम्हे ब्रे, चमोदी प्रबोदा, पूजा महातो, वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला, केटी जोन्स. 12 वी खेळाडू : एन्थाबिसेंग निनी.