Pandharpur News: एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, 2 चिमुकल्यांसह पती-पत्नीची आत्महत्या
या भयंकर कृतीने सासर आणि माहेरचे लोक हादरले
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे ऐन आषाढी एकादशीदिवशी घरगुती वादातून पतीसोबत रोज होत असलेल्या भांडणामुळे मोनाली म्हमाजी आसबे (वय 25), ईश्वरी म्हमाजी आसबे (वय 5), कार्तिक म्हमाजी आसबे (वय 3, सर्व रा. कासेगाव) यांनी रविवार, 6 जुलै रोजी कासेगाव येथील एका विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली.
ही बातमी मोनाली यांचे पती म्हमाजी यांना समजली. या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसला. ते अत्यंत निराश झाले. या नैराश्यातून म्हमाजी यांनी (सोमवार, .7 जुलै) रोजी कासेगाव येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
नवरा-बायकोमधील किरकोळ वादातून विवाहितेने एवढे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे गावकरी हादरून गेले. कासेगाव नजीकच्या एका शेतात 50 फुटी खोल विहिरीत मोनाली हिने पोटच्या दोन गोळ्यांसह त्यांच्या भवितव्याचा विचार न करता उडी घेतली. हे कळताच पतीनेही गळफास घेतला. या भयंकर कृतीने सासर आणि माहेरचे लोक हादरले.
या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. आसबे शेती करून तो गावात आई-वडील व कुटुंबासह राहत होता. याबाबत मोनाली यांचे वडील सुधाकर उत्तम पाटील (वय 61, रा. देगाव, ता. मोहोळ) यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून घटनास्थळी उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुरी यांनी भेट दिली. तपास सहायक निरीक्षक वडणे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक टी. वाय. मुजावर करीत आहेत.
वृद्ध आई-वडिल बेशुध्द
आदल्या दिवशी सून आणि दोन छोट्या नातवंडांच्या मृत्यूने धक्क्यात असतानाच दुसऱ्या दिवशी मुलानेही गळफास घेतला. हा आणखी एक धक्का बसल्याने म्हमाजी यांचे आई-वडील बेशुद्ध झाले. त्यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
किरकोळ कारणावरून टोकाचे पाऊल
रविवारी कासेगावनजीक पंढरपूर शहरात आषाढी साजरी होत असताना एका विवाहित महिलेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर सासर आणि माहेरचे कुटुंब हादरून गेले असून घरगुती अत्यंत किरकोळ कारणावरून मोनाली चुकीचे पाऊल उचलेल असे कोणालाच वाटत नव्हते. मुलीचे वडील सुधाकर पाटील यांनी काही तक्रार नाही, दोन्ही कुटुंबे दु:खात आहेत, असे पोलिसांना सांगितले.