घराचे छत कोसळल्याने चौघांचा मृत्यू
विजापूर जिल्ह्यातील घटना : दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा मृतांमध्ये समावेश
वार्ताहर/विजापूर
अचानक घराचे छत कोसळल्याने दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे मोरटगी (ता. आलमेल) येथे ही घटना घडली. गुरुनाथ बडिगेर (वय 35), पत्नी ज्योती बडिगेर (वय 28), मुलगी काळम्मा बडिगेर (वय 13) आणि धाकटी मुलगी कीर्ती बडिगेर (वय 9) अशी मृतांची नावे आहेत. घटनेविषयी अधिक माहिती अशी, गुरुनाथ, ज्योती, काळम्मा, कीर्ती बडिगेर हे गुरुवारी रात्री घरात झोपले होते. तर दुसऱ्या घरात गुरुनाथ यांची आई शांताबाई व गुरुनाथ यांचा मुलगा वीरेश (वय 10) झोपले होते. अचानक शुक्रवारी सकाळी गुरुनाथ कुटुंबीय झोपलेल्या घराचे छत कोसळले. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुदैवाने दुसऱ्या घरात शांताबाई व वीरेश झोपले होते. त्यामुळे ते बचावले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले चार मृतदेह त्यांना काढता आले नाहीत. घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस, आरोग्य आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. या घटनेची नोंद सिंदगी पोलीस स्थानकात झाली आहे.
सरकारतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आनंद के., एसपी लक्ष्मण निंबरगी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली. मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करताना मंत्री एम. बी. पाटील यांनी सरकारतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच बचावलेल्या वीरेश बडिगेर याच्या शिक्षणाची जबाबदारीही शासनाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सिंदगीचे आमदार अशोक मनगुळी, माजी आमदार रमेश भुसनूर, नरसिंगसा तिवारी, अशोक वारद, तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गुरुनाथ बडिगेर यांच्या स्वत:च्या घराचे दुरुस्ती काम सुरू असल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते. शुक्रवारी ते स्वत:च्या घरी परतणार होते. मात्र, नियतीने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.