For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार दिन की जिंदगी....

06:33 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार दिन की जिंदगी
Advertisement

दुनिया भरोशावर चालणे किंवा सर्व काही छानच असणार आहे हे गृहितक धरून चालणे यात वाईट काहीच नाही. कारण प्रत्येकाने जर एकदम विरक्त विचार करायला सुरुवात केली तर या जगाचे व्यवहार चालणार तरी कसे? तेव्हा स्वत: बाबतीत आत्मविश्वास बाळगणे, परमेश्वरावर आणि जगाच्या व्यवहारावर विश्वास ठेवणे आणि आपलं आयुष्य सुरळीतपणे व्यतीत करणे हे गरजेचं आहे.

Advertisement

इक दिन बिक जाएगा माटी के मोल

जग में रह जायेंगे, प्यारे तेरे बोल

Advertisement

दूजे के होठों को देकर अपने गीत

कोई निशानी छोड, फिर दुनिया से डोल

मुकेशजींच्या स्वरातलं हेलावून सोडणारं हे गीत. याचं प्रत्यक्ष चित्रीकरण आणि सिच्युएशन हा भाग थोडा वेगळा असला तरी ज्या ज्या वेळेला रेडिओवर हे गीत लागतं, त्यावेळेला अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ही गोष्ट अशी असते की ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या शेवटच्या प्रवासाला जाते त्यावेळेला तिचे अंतिम संस्कार करताना अनेकांच्या मनात अनेक विचार येत असतात. तिला अंतिम निरोप देण्यासाठी जात असताना चालता चालता प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो की अरे कालपर्यंत तर हा होता आणि आज या क्षणाला हा नाही. या ‘आहे’ आणि ‘नाही’ मध्ये अंतर किती कमी असावं? कधी ते वर्षानुवर्ष असतं. कधी महिनोन्महिने असतं. कधी एक दोन दिवसातच होत्याचं नव्हतं होतं. तर कधी काही क्षणात खेळ संपतो. मग आपण कशाच्या जोरावर उद्याची वचनं अख्ख्या जगाला देत असतो? आपण जिवंत राहण्याला काहीतरी आधार असावा लागतो. आणि आपण आहोत, असणार आहोत, उद्याचा सूर्योदय आपण बघणार आहोत असं गृहित धरून जगाचे सगळे व्यवहार, सगळ्या उलाढाली सुरू असतात. परंतु ज्या वेळेला अशी कोणतीही घटना घडते त्या वेळेला मात्र प्रत्येकाला प्रश्न पडतो की उद्या मी काय काय करीन याचं वेळापत्रक मी ठरवून ठेवलंय. उद्या मी भेटायला येईन असं कित्येकांना सांगून बसलोय. आठवड्यानंतर काय करायचं, महिन्यानंतर काय करायचं, वर्षभरात काय करायचं या सगळ्या गोष्टींचं नियोजन मी मनाशी ठरवून ठेवलेलं आहे. पण आज मला प्रश्न पडतोय की माझ्यासमोर ज्या व्यक्तीचे अंतिम संस्कार सुरू आहेत ती तासाभरापूर्वीपर्यंत अस्तित्वात होती. त्यानेही माझ्याचसारखी अनेकांना वचनं दिली असतील. अनेक कार्यक्रम ठरवले असतील. या वर्षभरात काय करायचं यासंबंधी अनेक गोष्टींचे प्लान त्याच्या मनात तेव्हा तयार असले असतील. त्यापैकी एकही गोष्ट न करताच बसल्याजागी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. माझ्याबाबतीत असंच होणार नाही ना? ही भीती तेव्हा उसळी मारून वर येते याला म्हणतात आयुष्य क्षणभंगुर आहे याची पहिली समज मिळणं. असे परमेश्वराने या घटनांचे साक्षीदार आपल्याला करून आपल्यापर्यंत एक संदेश पोहोचवलेला असतो. असे असंख्य संदेश मिळूनही, जी व्यक्ती जाते ती जाईपर्यंत तिने त्या संदेशांचा अर्थ लावण्याचा कधी प्रयत्न केलेला नसतो. मी उद्या आहे, उद्या असणार आहे याच गृहितकावर दुनिया चाललेली आहे हे खरं.

दुनिया भरोशावर चालणे किंवा सर्व काही छानच असणार आहे हे गृहितक धरून चालणे यात वाईट काहीच नाही. कारण प्रत्येकाने जर एकदम विरक्त विचार करायला सुरुवात केली तर या जगाचे व्यवहार चालणार तरी कसे? तेव्हा स्वत: बाबतीत आत्मविश्वास बाळगणे, परमेश्वरावर आणि जगाच्या व्यवहारावर विश्वास ठेवणे आणि आपलं आयुष्य सुरळीतपणे व्यतीत करणे हे गरजेचं आहेच.

परंतु अनेक वाद्यांच्या प्रचंड मोठ्या वाद्यमेळात उत्तम लावलेल्या तानपुऱ्याचा षड्ज जसा अव्याहतपणे पाठीमागे सुरू राहतो, तसा मनात एक विचार खरंतर सुरू राहिला पाहिजे. की आज मी आहे हे ठीकच आहे. उद्या मी असेन हेही मला वाटतच आहे. परंतु नसलो तर काय याची थोडीशी तरी मानसिक तयारी मी केली पाहिजे. कारण ‘जातस्य ही धृवो मृत्यू:’ हे ठरलेलं आहे. जो जो जन्माला आला त्याला जायचं आहे हे अंतिम सत्य आहे. परंतु हे नुसतं बोलून दाखवण्याइतकं सोपं नक्कीच नाही. पहिल्या पहिल्यांदा या सगळ्याची प्रचंड भीती बसते. म्हणून माणसांना मरणवाचक उद्गार तोंडून काढवतसुद्धा नाहीत. याचा अर्थ येता जाता मृत्यूविषयी बोलत राहावं असं मात्र नव्हे. कारण मग माणसाचा सगळाच आत्मविश्वास संपून जाईल. कायम रडतच बसावं लागेल.

पं. जगन्नाथ पुवा पुरोहित हे ‘गुणिदास’ या नाममुद्रिकेसह रचना करीत असत. त्यांच्या वार्धक्याच्या काळात त्यांनी एक सुंदर रचना केलेली होती. अहिरभैरवातील ही रचना आजही कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर गायली जातेच आणि अतिशय लोकप्रिय आहे.

मनवा तू जागत रहियो, मान लो मोरी बात। जग झूठा सब माया झूठी, कोई नहीं तेरा गुनिदास ये जग में।

त्यांच्यासंबंधी जे लेखन केलं गेलेलं आहे त्या लेखनातून असा संदर्भ मिळतो की बुवांनी ही रचना करतेवेळी त्यांची अवस्था अशी झालेली होती की काहीतरी आपणाला सुचत आहे असं वाटून त्यांना काही केल्या झोप येत नव्हती. मग उत्तररात्री कधीतरी निरोप पाठवून त्यांनी आपल्या एका शिष्याला बोलावून घेतलं. आणि त्याला ही रचना सहज गुणगुणून ऐकवली. आपादमस्तक पासोडी पांघरून बसलेल्या आपल्या गुरुजींच्या तोंडून इतकी विरक्त रचना ऐकून प्रथमत: त्यांना खरंतर धक्काच बसला. परंतु ही रचना किती किंमती आहे हे ते जाणत असल्याने गुरुशिष्यांनी त्यावर चर्चा करून ही रचना आकाराला आणली. त्यानंतर पुढे काही काळातच बुवांचं निधन झालं. त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का? असाही रचना ऐकल्यावर प्रश्न पडतो. कारण त्या बंदिशीतले अतिशय सुंदर शब्द असे आहेत ‘मनुवा तू जागत रहियो’ आणि दुसरं म्हणजे ‘जग झूठा सब माया झूठी, कोई नही तेरा’! मृत्यू येणार आहे म्हणून आपण सगळेच घाबरत असतो. पण मुळात मृत्यूची जाणीव ही कशासाठी होणं आवश्यक आहे हे आपल्याला कुणालाच कळत नसतं.

जगात फार थोडी माणसं अशी असतात की जी कुटुंबाच्या, स्नेहाच्या आणि आधाराच्या बाबतीत श्रीमंत असतात. पैसा सर्व गोष्टी करतो हे अगदी खरं असतं यात काही वादच नाही. परंतु आपल्या पाठीमागे आपल्या माणसांना मदत करायला कोणी माणसं नसतील तर असलेला पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा किती जड जातं याची अनेक उदाहरणं आपण बघतच असू. कित्येकवेळेला असं असतं की माणसं खूप पैसा कमावतात परंतु आपण किती पैसा कमावला आहे, तो नक्की कुठे कुठे ठेवलेला आहे आणि आपल्या मृत्यूनंतर तो पैसा नक्की कुणाच्या ताब्यात द्यायचा आहे यासंबंधी हयात असताना काही नियोजन करणं हेच त्यांनी केलेलं नसतं. असं नियोजन नसल्यामुळे कित्येकदा त्यांनी कमावून ठेवलेल्या पैशाविषयी कुटुंबीयांना काही माहितीच होत नाही. एका जागी तो कमावलेला प्रचंड पैसा पडून राहतो आणि एकीकडे त्यांची कुटुंबं हालअपेष्टा सोसत राहतात. कारण एकच असतं. त्यांनी आपल्या आर्थिक नियोजनाविषयी, कमाईविषयी कुटुंबाला नीट अशी माहिती दिलेली नसते. बहुतेक लोक हे सगळं गुप्त ठेवणं पत्करतात. काही मर्यादेपर्यंत ते योग्यही आहे. परंतु असा कोणता तरी प्रसंग बघितल्यानंतर तरी माणसाने शहाणं होऊन किमान दस्तावेजीकरण करून ठेवणं आवश्यक असतं हेही या निमित्ताने लक्षात येतं.

सर्वात महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे जसं वय वाढेल, जसे अनुभव येतील तसे माणसाने घट्ट धरून ठेवलेले आकस सोडलेलेच बरे असतात. कारण आपला उद्याचा भरवसा नसतो. ज्याच्यावर आपण दात धरून असतो त्याचाही भरवसा नसतो. काही वेळेला जिच्यावर आपण आकस धरतो ती व्यक्ती एकाएकी अकाली हे जग सोडून जाते आणि नंतर आपल्या मनाला खात राहतं की तेव्हाच मी हिच्याशी बोललो असतो तर बरं झालं असतं. पण पश्चात्तापाचा काही उपयोग नसतो. आपण जग सोडून जाताना बरोबर काय घेऊन जाणार तर आपल्या मनात बांधलेलं विचारांचं गाठोडं! दुसरं काय? मग त्या गाठोड्यात फुलं ठेवायची का निखारे ठेवायचे हे ज्याचं त्याने ठरवावं. आमच्या सर्वांच्या मनात आठवणींची फुलं ठेवून गेलेल्या आमच्या कलाकार मित्राच्या म्हणजेच?. विवेक गोखले याच्या मृत्यूने जो चुरका मनाला दिलाय त्यातून आज हे शब्द बाहेर पडलेयत. आठवणी आता जखमा झाल्या आहेत. बाकी चार दिन की जिंदगी! खरं ना?

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.