चार दिवसांचा सामना अनिर्णित
सामनावीर सॅम हार्पर : 128धावा : मालिकावीर शम्स मुलांनी : 55 धावा व 10 बळी
वृत्तसंस्था, पुडुचेरी
यजमान भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील चार दिवसांचा दुसरा सामना शुक्रवारी अनिर्णित अवस्थेत संपला. दोन सामन्यांची ही मालिका भारत अ संघाने 1-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत अ ने ऑस्ट्रेलिया अ चा 162 धावांनी पराभव केला होता. मुलानीला मालिकावीर तर सॅम हार्परला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाला विजयासाठी 365 धावांचे कठिण आव्हान दिले होते. त्यानंतर भारत अ संघाने 1 बाद 28 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांची एकवेळी स्थिती 60.2 षटकात 7 बाद 199 अशी केविलवानी होती. त्यानंतर भारत अ संघातील यश राठोड आणि मुलानी या जोडीने 36 षटके खेळून काढत हा सामना अखेर अनिर्णित राखला. भारत अ संघाने दुसऱ्या डावात 9 बाद 310 धावा जमविल्या. राठोडने 138 चेंडूत 80 तर मुलानीने 131 चेंडूत 29 धावा जमविल्या. या जोडीने जुन्या चेंडूवर 36 षटके तर नव्या चेंडूवर 16 षटके खेळून काढली. या जोडीने आठव्या गड्यासाठी 80 धावांची भागिदारी केली. नचिकेत भुतेने नाबाद 20 धावा जमविल्या. तुषार देशपांडेने 119 चेंडूत 52 धावांची खेळी करत हा सामना अनिर्णित राखला. देशपांडेने कर्णधार पडिक्कल समवेत तिसऱ्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. पडिक्कलने 26 धावा जमविल्या. उपहारावेळी भारत अ संघाने 2 बाद 99 धावा जमविल्या होत्या. चहापानावेळी भारत अ संघाची स्थिती 7 बाद 205 अशी होती. ऑस्ट्रेलिया अ तर्फे स्कॉटने 37 धावांत 5 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया अ प. डाव 358, भारत अ प. डाव 167, ऑस्ट्रेलिया अ दु. डाव 4 बाद 173 डाव घोषित, भारत अ दु. डाव 103 षटकात 9 बाद 310 (तुषार देशपांडे 52, यश राठोड 80, मुलानी 29, पडिक्कल 26, भुतेश नाबाद 20, स्कॉट 5-37).