For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार चिनाब प्रकल्पांना वेगाने चालना

06:45 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार चिनाब प्रकल्पांना वेगाने चालना
Advertisement

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सज्ज : चिनाब नदीव्यवस्थेवरील सहा प्रकल्पांच्या साहाय्याने मोठी वीजनिर्मिती शक्य

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काश्मीरमधून पाकिस्तानात वाहात जाणाऱ्या चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांना वेगाने चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे पाकिस्तानकडे जाणारा जलौघ मोठ्या प्रमाणात अडविला जाणार असून पाकिस्तानची कोंडी होणार आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानशी झालेला सिंधू जलवितरण करार स्थगित केला आहे. त्यामुळे काश्मीरमधून वाहणाऱ्या सर्व नद्यांच्या पाण्याचा उपयोग भारत स्वत:साठी करण्यास स्वतंत्र आहे. हे चार जलविद्युत प्रकल्प त्वरेने पूर्ण झाल्यास या भागातील वीजपुरवठ्यात वाढ होणार आहे, असे स्पष्ट केले गेले.

Advertisement

चिनाब नदी पाकिस्तानातील सिंधू नदीला पाणीपुरवठा करते. सिंधू नदी ही पाकिस्तानची जीवनरेखा समजली जाते. या नदीत येणाऱ्या पाण्याचा ओघ कमी झाला तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव येऊ शकतो. पाकिस्तानातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणावर सिंधू नदीवर अवलंबून आहे. या नदीच्या पाण्याचा ओघ 25 टक्के कमी झाला तरी पाकिस्तानातील शेती मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत भारताने चिनाब नदी व्यवस्थेवर अधिक संख्येने जलविद्युत प्रकल्प उभे केल्यास भारताच्या वीज पुरवठ्यात वाढ होणारच आहे, शिवाय पाकिस्तानचीही कोंडी होणार आहे. यासाठी भारताने हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.

किश्तवार प्रकल्प महत्त्वाचा

जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथे निर्माण केला जात असलेला चिनाब नदीवरील पाकल दुल हा जलविद्युत प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पाची क्षमता 1 हजार मेगा वॅटची आहे. चिनाब खोऱ्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. येथील धरणाची उंची 167 मीटर असून ती भारतातील कोणत्याही अन्य धरणापेक्षा अधिक आहे. हा प्रकल्प चिनाब नदीच्या एका उपनदीवर साकारला जात आहे. 2018 मध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पाकल दुल प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत, अर्थात, आणखी 11 महिन्यांमध्ये कार्यान्वित करण्याचा आदेश केंद्र सरकारने अधिकाऱ्यांना दिला आहे.

किरु प्रकल्पही तितकाच उपयुक्त

पाकल पुल प्रकल्पाला समांतर असणारा किरु प्रकल्पही भारताच्या दृष्टीने तितकाच लाभदायक आहे. यासाठी चिनाब नदीवर किरु धरण बांधण्यात येत आहे. या धरणाची ऊंची 135 मीटर असून हा ‘रन ऑफ द रिव्हर’ (पळत्या पाण्यावरचा प्रकल्प) पद्धतीचा प्रकल्प आहे. भारताने या नदी व्यवस्थेवर प्रकल्पांची जी मालिका स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे, त्या मालिकेवर या प्रकल्पाची उपयुक्तता अवलंबून आहे. हा प्रकल्पही डिसेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित झाला पाहिजे, असा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांवर आता वेगाने काम होत असून ते वेळेत पूर्ण केले जातील, असे दिसून येत आहे.

तिसरा खांब क्वार प्रकल्प

याच मालिकेतील तिसरा खांब म्हणून ओळखला जाणारा क्वार प्रकल्प साकारण्यासाठी चिनाब नदीवर क्वार धरण बांधण्यात येत आहे. हे धरण 109 मीटर उंचीवर आहे. या धरणाचे बांधकाम करण्यासाठी 2024 मध्ये भारताने यशस्वीरित्या चिनाब नदीच्या पाण्याचे पात्र वळविले आहे. हा अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार मानला जात आहे. हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत कार्यान्वित केला जाणार असून तोही वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

रेतले प्रकल्पाला सर्वाधिक विरोध

चिनाब नदी व्यवस्थेवरचा चौथा महत्त्वाचा प्रकल्प रेतले हा आहे. याची ऊंची 133 मीटर आहे. या प्रकल्पाला पाकिस्तानने सर्वाधिक विरोध केला आहे. या प्रकल्पाची क्षमता 850 मेगावॅट विद्युत निर्मितीची आहे. या सर्व प्रकल्पांमुळे भारताची जलविद्युत निर्मिती क्षमता तर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेच. पण त्याही पक्षा महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानला किती पाणी सोडायचे, केव्हा सोडायचे आणि सोडायचे की नाही, हे निर्धारित करण्याची व्यवस्था भारताच्या हाती राहणार आहे. भारताच्या या सर्व प्रकल्पांवर पाकिस्तानने आक्षेप घेतला असला तरी त्याला भीक न घालता भारत आपला निर्धार पूर्ण करण्याच्या मार्गाला लागलेला आहे.

दुलहस्ती टप्पा दोनसाठीही सज्ज

चिनाब नदीवरच्या दुलहस्ती-टप्पा 2 प्रकल्पावरही वेगाने काम होत आहे. या प्रकल्पाला नुकतेच केंद्रीय पर्यावरण विभागाकडून नाआक्षेप प्रमाणपत्र मिळाले आहे. दुलहस्ती-1 हा प्रकल्प आता मार्गी लागला असून तो कार्यान्वित करण्याच्या स्थितीत आहे. त्याचे कार्यान्वयन झाल्यानंतर त्वरित दुलहस्ती-2 हा प्रकल्पही पूर्ण होणार असून चिनाब नदी व्यवस्थेवर एकंदर सहा प्रकल्पांची पूर्तता होणार आहे.

भारताच्या हालचाली गतिमान

ड सिंधू नदीतील पाणी प्रवाहाचे नियंत्रण करण्याची क्षमता भारत प्राप्त करणार

ड सिंधू नदी पाकिस्तानची जीवनरेखा असल्याने या प्रकल्पांमुळे तो देश कोंडीत

Advertisement
Tags :

.