सर्वेश कंग्राळकरच्या खून प्रकरणी शशी जालगारसह चौघांना अटक
माळमारुती पोलिसांची कारवाई : अन्य साथीदार फरार
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
मारुतीनगर, सांबरा रोड येथील तरुणाच्या खून प्रकरणी माळमारुती पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी काही जण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नियोजनबद्धरीत्या तरुणाला बोलावून त्याचा काटा काढण्यात आला होता.
शशी जालगार व त्याचे साथीदार असलेले राहुल, दशरथ, अरुण यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
गेल्या रविवार दि. 20 सप्टेंबर रोजी रात्री सर्वेश अभिजीत कंग्राळकर (वय 27) राहणार मारुतीनगर, सांबरा रोड या तरुणाचा भीषण खून करण्यात आला होता. मंडोळी रोड, वाटवे कॉलनी परिसरात ही घटना घडली होती. खुनानंतर सर्वेशचा मृतदेह खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीत टाकण्यात आला होता. दि. 25 सप्टेंबर रोजी खानापूर तालुक्यातील कोकणवाडीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
यासंबंधी पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्याशी संपर्क साधला असता तरुणाच्या खून प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीअंतीच सर्वेशचा खून कशासाठी झाला, या प्रकरणी आणखी किती जणांचा सहभाग आहे? याचा उलगडा होणार आहे.